'जिथे महिला सुरक्षित नाहीत, तो समाज कलंकित...', कोलकाता प्रकरणावर उपराष्ट्रपतींचा संताप
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2024 03:34 PM2024-08-30T15:34:09+5:302024-08-30T15:35:05+5:30
उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी कोलकाता बलात्कार-हत्या प्रकरणावर तीव्र नाराजी व्यक्त केली.
कोतकाता- पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथील आरजी कार मेडिकल हॉस्पिटलमध्ये प्रशिक्षणार्थी डॉक्टरची बलात्कारानंतर निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेमुळे गेल्या अनेक दिवसांपासून देशात संतापाची लाट आहे. बंगालमध्ये तर भाजपचे ममता बॅनर्जी यांच्या सरकारविरोधात जोरदार आंदोलन सुरू आहे. दरम्यान, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यानंतर आता उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी या घटनेवर आपला संताप व्यक्त केला आहे.
आज हम एक चौराहे पर खड़े हैं।
— Vice-President of India (@VPIndia) August 30, 2024
Let us echo what the President of India has said: enough is enough!
I want this clarion call to be a national call. I want everyone to be participant in this call.
Let us resolve to create a system of zero accommodation, zero tolerance for such… pic.twitter.com/ndSUmmEfyH
दिल्ली विद्यापीठाच्या भारती कॉलेजमध्ये एका कार्यक्रमाला संबोधित करताना उपराष्ट्रपती म्हणाले की, "ज्या समाजात महिला आणि मुलींना सुरक्षित वाटत नाही, तो समाज सुसंस्कृत नाही. आपली लोकशाही कलंकित झाली, हाच आपल्या प्रगतीतील सर्वात मोठा अडथळा आहे. महिलांच्या मनात या प्रकारची भीती हा राष्ट्रीय चिंतेचा विषय आहे. आता खुप झाले, याकडे लक्ष देण्याची गरज आहे. अशा गुन्ह्यांबाबत झिरो टॉलरन्स असायला हवे," अशी प्रतिक्रिया जगदीप धनखड यांनी दिली.
राष्ट्रपती मुर्मू काय म्हणाल्या.?
यापूर्वी राष्ट्रपती मुर्मू यांनीही कोलकाता घटनेवर संताप व्यक्त केला होता. "बसं आता खूप झालं...कोणताही सुसंस्कृत समाज महिलांवर असे अत्याचार होऊ देऊ शकत नाही. समाजाला 'प्रामाणिक, निःपक्षपाती आत्मनिरीक्षणाची' आणि स्वतःला काही कठोर प्रश्न विचारण्याची गरज आहे. समाजाची दयनीय मानसिकता महिलांना कमी लेखते. निर्भयाच्या घटनेनंतर आपल्याला सामूहिक स्मृतिभ्रंशाचा त्रास झाल्याचे दिसते. त्या प्रकरणानंतर 12 वर्षात असंख्य बलात्कार झाले, ज्यांना समाज विसरला आहे. आता भारताला इतिहासाला सामोरे जाण्याची वेळ आली आहे. या संकटाचा आपण सर्वसमावेशकपणे सामना केला पाहिजे. कोलकातामध्ये विद्यार्थी, डॉक्टर आणि नागरिक आंदोलन करत असतानाही गुन्हेगार कुठेतरी लपून बसले आहेत," अशी प्रतिक्रिया मुर्मू यांनी दिली.
काय आहे कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरण?
कोलकाता येथील आरजी कार मेडिकल हॉस्पिटलच्या सेमिनार हॉलमध्ये 9 ऑगस्ट रोजी 31 वर्षीय प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरचा मृतदेह सापडला होता. तिच्या अंगावर कपडे नव्हते, शरीरावर जखमांच्या खुणा होत्या, अंगातून रक्त येत होते. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी संजय रॉय याला अटक केली आहे. उच्च न्यायालयाने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला आहे.