महिला, बालके, वृद्ध, अपंगांवर झाली ‘प्रभू’कृपा!

By admin | Published: February 26, 2016 12:19 AM2016-02-26T00:19:25+5:302016-02-26T00:19:25+5:30

रेल्वे प्रवासादरम्यान महिलांना आता आपल्या लहान बाळांसाठी गरम पाणी व गरम दूध मिळेल. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी रेल्वेगाडी आणि रेल्वे स्थानकांवर शिशू आहार, गरम दूध, गरम पाणी

Women, children, elderly, disabled, 'Prabhu'! | महिला, बालके, वृद्ध, अपंगांवर झाली ‘प्रभू’कृपा!

महिला, बालके, वृद्ध, अपंगांवर झाली ‘प्रभू’कृपा!

Next

नवी दिल्ली : रेल्वे प्रवासादरम्यान महिलांना आता आपल्या लहान बाळांसाठी गरम पाणी व गरम दूध मिळेल. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी रेल्वेगाडी आणि रेल्वे स्थानकांवर शिशू आहार, गरम दूध, गरम पाणी उपलब्ध करून देण्याची घोषणा केली. याशिवाय रेल्वेगाड्यांच्या शौचालयांमध्ये शिशूंसाठी चेंजिंग बोर्डही उपलब्ध असेल.
अधिस्वीकृत पत्रकारांना ई-तिकीट
अधिस्वीकृतीधारक पत्रकारही आता अन्य प्रवाशांप्रमाणे सवलती परवान्यावर आॅनलाइन रेल्वे तिकीट मिळवू शकतील. दीर्घकाळापासून ही मागणी प्रलंबित होती.
‘कुली’ नव्हे ‘लगेज असिस्टंट’
‘कुली’ किंवा ‘हमाल’ आता ‘लगेज असिस्टंट’ म्हणून ओळखले जातील. रेल्वे स्थानकांवरील हमालांना विमानतळांवर असतात, तशा ट्रॉलीज आणि नवा गणवेशही मिळणार आहे. त्यामुळे लवकरच रेल्वेस्थानकांवर लाल डगले घातलेले बिल्लेधारी हमाल प्रवाशांच्या लगेजची अवजड बोजी डोक्यावर आणि खांद्यावर घेऊन जात असल्याचे सर्वांना परिचित असलेले चित्र इतिहासजमा होईल.
ज्येष्ठांना लोअर बर्थसाठी जादा कोटा
ज्येष्ठ नागरिकांना प्रवासादरम्यान होणारा त्रास व अडचणी लक्षात घेता, रेल्वेमंत्र्यांनी प्रत्येक प्रवासी डब्यात ज्येष्ठ नागरिकांसाठी लोअर बर्थच्या कोट्यात ५० टक्क्यांपर्यंत वाढ केली. यामुळे ज्येष्ठ नागरिकांना प्रत्येक गाडीत सुमारे १२० लोअर बर्थ मिळतील. याशिवाय ज्येष्ठांना आॅनलाइन तिकिटांची बुकिंग करताना सवलतीचा लाभ घेण्यासाठी एकदाच रजिस्ट्रेशन करावे लागेल.
व्हीलचेअरचे आॅनलाइन बुकिंग
रेल्वे अर्थसंकल्पात दिव्यांगांसाठी विशेष सोईसुविधांवर भर देण्यात आला आहे. सर्व रेल्वे स्थानके दिव्यांगांसाठी अनुकूल बनवण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. याशिवाय ए-१ क्लासच्या स्थानकांवर दिव्यांगासाठी अनुकूल असे किमान एक शौचालय उभारले जाईल. व्हीलचेअरचे आॅनलाइन बुकिंग होईल, तसेच स्वयंचलित जिना, लिफ्टची संख्या वाढेल.
दृष्टिहिनांसाठी ब्रेल लिपीत सूचना
अंध प्रवाशांच्या सोयीसाठी नव्या रेल्वे कोचमध्ये ब्रेल लिपीतील दिशानिर्देश व सूचनांची सोय करण्यात येईल.

महिलांसाठी सोयी
महिला सुरक्षेच्या दृष्टिकोनातून प्रवासी डब्याचा मधला भाग त्यांच्यासाठी आरक्षित करण्यात आला आहे. रेल्वे प्रवास करताना महिलांना २४ तास १८२ क्रमांकावर मदत मिळू शकेल. महिला सुरक्षा वाढवण्यासाठी ३११ रेल्वेस्थानकांवर सीसीटीव्ही लावले जातील. यानंतर टप्प्याटप्प्याने सर्व स्थानके सीसीटीव्हीच्या निगराणीखाली आणली जातील.

Web Title: Women, children, elderly, disabled, 'Prabhu'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.