CRPFच्या रणरागिनी सज्ज; दगड फेकणाऱ्या काश्मिरींना हिसका दाखवणार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2018 09:06 PM2018-06-30T21:06:47+5:302018-06-30T21:07:38+5:30
दगडफेकीच्या घटनांना आळा घालण्यासाठी खास रणनिती
श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांना दररोज स्थानिकांकडून होणाऱ्या दगडफेकीला सामोरं जावं लागतं. सुरक्षा दलाच्या जवानांवर दगड भिरकावणाऱ्यांमध्ये महिलांचाही सहभाग असतो. महिलांकडून होणारी ही दगडफेक सुरक्षादलांसाठी आव्हानात्मक ठरत आहे. त्यामुळे केंद्रीय राखीव पोलीस दलानं (सीआरपीएफ) महिलांकडून होणाऱ्या दगडफेकीला आळा घालण्यासाठी खास रणनिती तयार केली आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांवर दगडफेक करणाऱ्या महिलांचा सामना करण्यासाठी सीआरपीएफनं महिला कमांडोंची एक खास टीम तयार केली आहे. या टीमला विशेष प्रशिक्षण दिलं जात आहे. यानंतर या महिला कमांडोंकडे दगडफेक करणाऱ्या महिलांविरोधात कारवाई करण्याची जबाबदारी दिली जाणार आहे. अचानक दगडफेक सुरू झाल्यास, त्या परिस्थितीचा सामना कसा करायचा, याचं प्रशिक्षण महिला कमांडोंना देण्यात येत आहे. डोळ्यांवर पट्टी बांधून धोका नेमका कोणत्या बाजूनं येत आहे आणि त्याचा मुकाबला कसा करायचा, याचं प्रशिक्षण कमांडोंना दिलं जात आहे.
काश्मीर खोऱ्यात रात्री उद्भवणाऱ्या प्रतिकूल परिस्थितीत नेमकी काय पावलं उचलायची, सशस्त्र हल्ला करणाऱ्या व्यक्तीशी दोन हात कसे करायचे, याची तयारी सध्या महिला कमांडोंकडून करुन घेतली जात आहे. काश्मीर खोऱ्यातील महिला सुरक्षा दलांवर दगडफेक करत असल्याचं चित्र गेल्या वर्षी समोर आलं होतं. या परिस्थितीत अद्याप फारसा फरक पडलेला नाही. त्यामुळेच आता जम्मू-काश्मीरमध्ये सीआरपीएफच्या महिला कमांडोंना तैनात केलं जाणार आहे.