महिलांनो, करा घरातलीच कामे; जात्यावर दळण दळा, फरशा पुसा, पाणी भरा - राजस्थान सरकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2017 06:01 AM2017-11-12T06:01:25+5:302017-11-12T06:01:25+5:30
महिलांनी सुदृढ राहण्यासाठी जात्यावर दळण दळावे, पाण्याच्या घागरी वाहाव्यात आणि घराच्या फरशा साफ कराव्यात, असा अजब सल्ला राजस्थान सरकारच्या शिक्षण खात्याने दिला आहे.
जयपूर : महिलांनी सुदृढ राहण्यासाठी जात्यावर दळण दळावे, पाण्याच्या घागरी वाहाव्यात आणि घराच्या फरशा साफ कराव्यात, असा अजब सल्ला राजस्थान सरकारच्या शिक्षण खात्याने दिला आहे.
शिक्षकांसाठीच्या ‘शिविरा’ या मासिकाच्या नोव्हेंबरच्या अंकात हा सल्ला आहे. ‘स्वस्थ रहने के सरल उपाय’ या लेखात कोका-कोला, पेप्सी पिऊ नका, मॉर्निंग वॉक, धावणे, सायकल चालविणे, घोडेस्वारी, पोहणे आदी व्यायाम करा, असा सल्ला आहे. महिलांना मात्र घरकामातूनच व्यायाम होतो, असेही लिहिले आहे. जात्यावर दळणे, घागरींनी पाणी भरणे, फरशा साफ करणे आदी कामे केल्यास महिला सुदृढ राहू शकतात, असे त्यात लिहिले आहे. (वृत्तसंस्था)
भेदभावाचा हेतू नाही?
राजस्थानच्या माध्यमिक शिक्षण विभागाचे संचालक आणि मासिकाचे मुख्य संपादक नाथमल डिडेल यांनी मासिकातील चूक मान्य केली आहे. डिडेल यांनी म्हटले की, महिलांसाठी व्यायाम म्हणून घरकामाची शिफारस करायला नको पाहिजे होती. तथापि, आपल्या समाजात परंपरेने हे घडत आले आहे. संबंधित लेखकावर त्याचा प्रभाव असण्याची शक्यता आहे. त्यामागे कोणताही भेदभावकारक हेतू नाही, याची ग्वाही मी देतो.
ही तर लाजिरवाणी बाब
‘शिविरा’ मासिकातील ही टिप्पणी महिलांबाबत भेदभाव करणारी असल्याची टीका यावरून सुरू झाली आहे. पीपल्स युनियन फॉर सिव्हिल लिबर्टी या संस्थेच्या राष्टÑीय सचिव कविता श्रीवास्तव यांनी सांगितले की, ज्यापासून महिलांना मुक्त करणे अपेक्षित आहे, त्याच बंधनात राजस्थानचे शिक्षण खाते महिलांना अडकवू पाहात आहे, ही बाब लाजिरवाणी आहे.