राम रहीमच्या डेरा सच्चा सौदापेक्षा भयंकर आश्रम, महिलांना ठेवलं जनावरांसारखं
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2017 11:19 AM2017-12-21T11:19:34+5:302017-12-21T11:23:12+5:30
दिल्ली हायकोर्टाने उत्तर दिल्लीतील एका आध्यात्मिक विश्वविद्यालयात मुलींना आणि महिलांना बंदी करून ठेवण्याच्या प्रकरणाचा तपास सीबीआयमार्फत करण्याचे आदेश दिले आहेत.
नवी दिल्ली- दिल्ली हायकोर्टाने उत्तर दिल्लीतील एका आध्यात्मिक विश्वविद्यालयात मुलींना आणि महिलांना बंदी करून ठेवण्याच्या प्रकरणाचा तपास सीबीआयमार्फत करण्याचे आदेश दिले आहेत. दिल्ली हायकोर्टाच्या मुख्य न्यायाधीस गिता मित्ता आणि न्यायमूर्ती सी हरी शंकर यांच्या खंडपीठाने सीबीआयला विशेष तपास पथकाकडून या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश दिले आहेत. देवाच्या नावावर महिलांना बंदी करून ठेवणं ही अतिशय भयंकर गोष्ट असल्याचं हायकोर्टाने बुधवारी म्हटलं. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी कोर्टाने दोन पथकांची स्थापना केली होती. या दोन पथकांनी रिपोर्ट सादर केला. आध्यात्मिक विश्वविद्यालयात मुली व महिलांना मारहाण केली गेली, जवळपास 100 पेक्षा जास्त मुलींना बंदी बनवून ठेवलं होतं. विश्वविद्यालयात आंघोळ करतानाही या मुलींना प्रायव्हसी देण्यात येत नाही, असं या रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलं आहे. हा आश्रम राम रहीमच्या आश्रमापेक्षाही खतरनाक असल्याचं, एका पीडित मुलीने सांगितलं.
या आश्रमात गेल्या अनेक वर्षांपासून अनुयायी असलेल्या एका पीडितेने सांगितलं की, आश्रमातील बाबा स्वतःला देव समजतो आणि तुमचं तन-मन-धन ईश्वराला समर्पित करायला सांगतो. आश्रमात येणाऱ्या अनुयायांचं ब्रेनवॉश केलं जातं. पीडितेच्या माहितीनुसार, या महिलेच्या चार मुली आश्रमात अनुयायी आहेत. चारपैकी एक मुलगी अल्पवयीन आहे. आरोपी बाबाने बलात्कार केल्याता आरोप त्या अल्पवयीन मुलीने केला आहे. आश्रमात अनेक महिला राहतात. पण त्या आश्रमात नेमकं कोण येतं-जातं,याबद्दल कुणालाही माहिती नाही. आश्रमावर छापा टाकून पोलीस जेव्हा बाहेर आले तेव्हा तेथे काहीही वाईट गोष्टी चालत नसल्याचं काही वृद्ध महिलांनी पोलिसांना सांगितलं.
कोर्टाने आध्यात्मिक विश्वविद्यालय आणि त्याचा संस्थापक वीरेंद्र देव दीक्षितच्या विरोधात सीबीआय चौकशीचे आदेश दिले आहेत. आध्यात्मिक विश्वविद्यालयात महिलांना आणि अल्पवयीन मुलींना जनावरांसारखं ठेवण्यात आलं. अनेक मुली-महिलांवर बलात्कार केले जात असल्याचं कोर्टाच्या निदर्शनास आलं. वीरेंद्र देव या बाबाचं आश्रम एका किल्ल्यासारखं आहे. कोर्टाकडून नियुक्त पॅनेलच्या चौकशीमध्ये या गोष्टी समोर आल्यानंतर लगेचच सीबीआयला एका विशेष पथकाची स्थानपा करून तपास करण्याचे आदेश दिले गेले. 'तपासासाठी आश्रमात गेल्यावर एक तास आत कोंडून ठेवलं तसंच मारहाण झाली, असं तपास पथकातील पोलिसांनी कोर्टात सांगितलं. आश्रमात 100 पेक्षा जास्त मुली-महिलांना बंदी करून ठेवण्यात आलं असून त्यापैकी अनेक मुली अल्पवयीन आहेत. विश्वविद्यालयात असणाऱ्या सगळ्या मुलींना लोखंड्याच्या जाळ्यांमध्ये जानवरांसारखं ठेवलं जातं आहे. संपूर्ण परिसराक उंचच-उंच तारांच्या भिंती आहेत, असंही पोलिसांनी कोर्टात सांगितलं. हायकोर्टाने आश्रमाची इमारत आणि तेथे काम करणाऱ्या पुरूष कर्मचाऱ्यांच्याही चौकशीचे आदेश दिले आहेत.
संपूर्ण तपासाचं व्हिडीओ शूटिंग करण्याचं तसंच तपास करताना पथकाने दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती जयहिंद यांना सोबत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.