दिल्लीपेक्षा मुंबईत महिला जास्त सुरक्षित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 02:37 AM2018-05-31T02:37:07+5:302018-05-31T02:37:07+5:30
महिलांच्या सुरक्षेच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी विविध विभाग, नागरी संस्थांबरोबर काम करीत आहोत. सर्व विभागांच्या सहयोगी प्रयत्नांमध्ये विश्वास आहे
मुंबई : महिलांच्या सुरक्षेच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी विविध विभाग, नागरी संस्थांबरोबर काम करीत आहोत. सर्व विभागांच्या सहयोगी प्रयत्नांमध्ये विश्वास आहे. सार्वजनिक ठिकाणी महिला सुरक्षित असतील, यासाठी कायम प्रयत्नशील असल्याने दिल्लीपेक्षा आजही मुंबईत महिला जास्त सुरक्षित आहे, असे प्रतिपादन महिला व बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी केले.
‘सेव्ह द चिल्ड्रन’ या मुले आणि महिलांच्या हक्कासंदर्भात काम करणाऱ्या संस्थेतर्फे ‘भारतातील मुलींचे जग, सार्वजनिक ठिकाणी असलेल्या मुलींच्या सुरक्षेबद्दल अभ्यास’ हा अहवाल मंगळवारी प्रकाशित झाला.
या महाराष्ट्र केंद्री अभ्यासात मुंबई महानगरपालिका, नांदेड महानगरपालिका, उल्हासनगर महानगरपालिका (मोठी शहरे), बारामती व लोणावळा यांसारख्या छोट्या शहरांमधील पौगंडावस्थेतील ५०९ मुली, पौगंडावस्थेतील १०९ मुलगे, १३५ पालक आणि
४२ तरुणींच्या मुलाखती घेण्यात आल्या.
धोरणात्मक सुधारणा, पोलीस दलात अधिक महिलांचा समावेश, सार्वजनिक ठिकाणी पुरेशी प्रकाश व्यवस्था, स्वयंसाहाय्य गट, बाल
गट, मातांचे गट या सामाजिक
साहाय्य गटांचा अधिक चांगल्या प्रकारे विकास करणे. टॅक्सी व बस चालकांसह सार्वजनिक वाहतूक व्यवस्थांमधील सर्व चालकांना लैंगिक प्रशिक्षण आणि मुलींच्या सुरक्षेततेसाठी अधिक स्रोत उपलब्ध होण्याची आवश्यकता या अहवालात नमूद करण्यात आली आहे. या अभ्यासातील सर्वेक्षण आसाम, दिल्ली-एनसीआर, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगण आणि पश्चिम बंगाल राज्यांमध्ये करण्यात आले.
सार्वजनिक ठिकाणी प्रत्येक मुलीला सुरक्षित वाटण्याचा हक्क आहे. या हक्काचे उल्लंघन होणार नाही आणि ही मुले सुरक्षितपणे कुठेही हिंडू-फिरू शकतील, याची आपण खातरजमा केली पाहिजे. आपण अधिक संवेदनशील होणे गरजेचे आहे आणि पालकांसह विविध भागधारकांचे सबलीकरण केले पाहिजे व मुलांच्या तक्रारी त्यांनी गांभीर्याने घ्याव्यात, जेणेकरून मुलांना सुरक्षित वाटेल आणि त्यांचा कायद्यावर विश्वास असेल.
- संजय शर्मा, सेव्ह द चिल्ड्रन, महाराष्ट्र प्रमुख