'त्या' महिला पोलिसाने अभिनेत्री नयनतारा असल्याचे भासवून गँगस्टरला केली अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2017 04:50 PM2017-12-23T16:50:59+5:302017-12-23T17:08:01+5:30
एका चणाक्ष महिला पोलीस अधिका-याने दक्षिणेची प्रसिद्ध अभिनेत्री नयनताराच्या फोटोचा वापर करुन एका गँगस्टरला सापळयात अडकवले.
पाटणा - बिहारमध्ये एका चणाक्ष महिला पोलीस अधिका-याने दक्षिणेची प्रसिद्ध अभिनेत्री नयनताराच्या फोटोचा वापर करुन एका गँगस्टरला सापळयात अडकवले. या प्रकरणी दरभंगा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काही दिवसांपूर्वी मोहम्मद हसनैन या गँगस्टरने भारतीय जनता पार्टीचे नेते संजय कुमार महंतो यांचा महागडा मोबाईल फोन चोरी केला. महंतो यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक मधुबाला देवी यांच्याकडे या प्रकरणाचा तपास देण्यात आला.
चोरलेल्या फोन्सचे कॉल डिटेल्स तपासल्यानंतर हसनैन अजूनही तो फोन वापरत असल्याचे लक्षात आले. अनेकवेळा पोलिसांनी हसनैनला पकडण्याचा प्रयत्न केला पण तो पोलिसांच्या तावडीतून निसटायचा. त्यानंतर मधुबाला देवी यांनी हसनैनला पकडण्यासाठीची रणनिती बदलली. एक सौदर्यवती तरुणी असल्याचे भासवून मधुबाला देवी यांनी हसनैनशी संपर्क साधण्यास सुरुवात केली.
आपण प्रेम मिळवण्यासाठी किती आतुर आहोत ते दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मधुबाला देवी त्याला नियमितपणे फोन करायच्या. सुरुवातीला हसनैन त्यांना फारसा प्रतिसाद देत नव्हता. पण नंतर एक फोटो पाहून हसनैन अगदी सहजगत्या त्यांच्या जाळयात फसला. हसनैनने एकदिवस मधुबाला देवींना त्यांचा फोटो पाठवायला सांगितला. त्यावेळी मधुबाला देवी यांनी त्यांच्या मोबाईल फोनवर प्रोफाईल फोटो म्हणून दक्षिणेची प्रसिद्ध अभिनेत्री नयनताराचा फोटो लावला.
हसनैनने जेव्हा मोबाईल फोनमधला प्रोफाईलवरचा फोटो पाहिला तेव्हा त्याचा आनंद गगनात मावत नव्हता. तो दरभंगा येथे एका ठिकाणी भेटण्यास तयार झाला. जेव्हा हसनैन ठरलेल्या ठिकाणी पोहोचला तेव्हा साध्या वेषातील पोलिसांनी त्याला पकडले असे मधुबाला देवी यांनी सांगितले. मोहम्मद हसनैनने त्याचा गुन्हा कबूल केला. आपण दुस-या एका गुन्हेगाराकडून साडेचार हजार रुपयांना हा मोबाईल विकत घेतल्याचे त्याने सांगितले. आता त्या दुस-या आरोपीचा शोध सुरु आहे. मधुबाला देवी यांनी जी हुशारी दाखवली त्याबद्दल बिहार पोलिसांनी त्यांना बक्षिस जाहीर केले आहे.