नक्षलवाद्यांविरुद्ध लढणार महिला पोलीस
By admin | Published: November 7, 2015 01:54 AM2015-11-07T01:54:04+5:302015-11-07T01:54:04+5:30
भविष्यात नक्षलवादाविरुद्ध मोहिमेत महिला पोलीस महत्त्वाची भूमिका वठविणार असून नक्षलग्रस्त छत्तीसगडमध्ये त्यांना भूसुरुंग निष्क्रिय करण्यासोबतच जंगलात युद्ध रणनीतीचे
रायपूर : भविष्यात नक्षलवादाविरुद्ध मोहिमेत महिला पोलीस महत्त्वाची भूमिका वठविणार असून नक्षलग्रस्त छत्तीसगडमध्ये त्यांना भूसुरुंग निष्क्रिय करण्यासोबतच जंगलात युद्ध रणनीतीचे धडे देण्यात येत आहेत.
येथून सुमारे १५० कि. मी. दूर बस्तरच्या उत्तरेकडील कांकेर जिल्ह्यात असलेल्या शासकीय काऊंटर टेररिझम अॅण्ड जंगल वॉरफेअर कॉलेजमध्ये (सीटीजेडब्ल्यूसी) सध्या राज्यातील महिला पोलिसांचे प्रशिक्षण सुरू आहे. नक्षल्यांच्या टोळ्यांमध्ये महिला नक्षलवाद्यांची वाढती संख्या लक्षात घेता नक्षलविरोधी मोहिमेत महिला सुरक्षा जवानांची गरज निर्माण झाली आहे. या केंद्रात आतापर्यंत ३०० महिला कमांडो तयार झाले आहेत.
प्रशिक्षक प्लाटुन कमांडर नरेंद्र सिंग यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, कॉन्स्टेबल स्तरावरील जवानांपासून अतिरिक्त पोलीस अधीक्षक पदापर्यंतच्या महिला जवान महाविद्यालयात ४५ दिवसांचा अत्यंत खडतर युद्ध प्रशिक्षण अभ्यासक्रम
पूर्ण करीत आहेत. याअंतर्गत
विविध पद्धतीने पेरण्यात येणारे आयईडी नष्ट व निष्क्रिय करण्यात
त्या विशेष रुची घेत आहेत. लष्करातून सेवानिवृत्त झालेल्या सिंग यांना आयईडी मोहिमेचा अनुभव आहे. (वृत्तसंस्था)
काय आहे प्रशिक्षण
नक्षल्यांच्या घातपातात सुरक्षा दलाचे कमीत कमी नुकसान व्हावे या अनुषंगाने बॉम्ब निष्क्रिय करण्याचे प्रशिक्षण देणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असे स्पष्ट करताना सिंग यांनी सांगितले की, महिला जवानांना इ.स.२००६ पासूनच यासाठी प्रशिक्षित करण्यात येत असले तरी आयईडीसंदर्भातील कौशल्यात त्या आतापर्यंत फारसा रस घेत नव्हत्या.
बहुधा नक्षलविरोधी मोहिमेत त्यांचा सक्रिय सहभाग नसणे हे यामागील मुख्य कारण होते. परंतु गेल्या वर्षभरापासून महिला पोलिसांकडून बॉम्ब नष्ट आणि निष्क्रिय करण्याच्या अतिरिक्त प्रशिक्षणाची मागणी होत होती. नक्षलग्रस्त भागात तैनात असताना संघर्षाच्या परिस्थितीचा सामना करण्यास आपण सज्ज असलो पाहिजे, असे त्यांना वाटू लागल्याने त्यांची मानसिकता बदलली आहे.
पोलिसांना जंगलयुद्ध आणि गनिमीकाव्याचे प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने २००५ साली सीटीजेडब्ल्यूसीची स्थापना करण्यात आली होती.
छत्तीसगड तीन दशकांपेक्षा अधिक काळापासून नक्षलवादाशी झुंजतो आहे. प्रशिक्षण केंद्रात ४५ दिवसांच्या प्रशिक्षणानंतर पोलीस नक्षलवाद्यांविरुद्ध मुकाबल्यास सज्ज होतात.
सात जिल्हे आणि ४०,००० चौरस कि.मी. भागात पसरलेल्या विशाल बस्तर क्षेत्रात नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या भूसुरुंग स्फोटात आतापर्यंत अनेक जवान मृत्युमुखी पडले असून जखमी होणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. सुरक्षा दलावर घातपात करून हल्ला करण्याकरिता काही उपकरणे अनेक वर्षे राष्ट्रीय महामार्ग, राज्यातील महत्त्वाचे मार्ग आणि सुरक्षा दलांच्या छावण्यांजवळून पेरून ठेवण्यात येतात.