Narendra Modi : "माझ्या नावावर कोणतंच घर नाही पण..."; पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2023 04:00 PM2023-09-27T16:00:37+5:302023-09-27T16:26:02+5:30
Narendra Modi : नरेंद्र मोदी यांनी बुधवारी आदिवासीबहुल जिल्ह्यातील बोदेली येथे जाहीर सभेला संबोधित केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी आदिवासीबहुल जिल्ह्यातील बोदेली येथे जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी ते म्हणाले की, विरोधकांनी आरक्षणाचे राजकारण केले, पण मी मुख्यमंत्री होईपर्यंत गुजरातच्या आदिवासी भागात विज्ञानाच्या शाळाच नव्हत्या. नरेंद्र मोदी यांनी महिला आरक्षण विधेयकाबाबत विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला.
"माझ्या नावावर कोणतंच घर नाही, पण देशातील अनेक मुलींच्या नावावर घरं देण्याचं काम मी केलं. आमच्या सरकारने नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणले आहे जे तीन दशकांपासून पडून होते" असं मोदींनी म्हटलं आहे. तसेच गरिबांना घर, पाणी, रस्ते, वीज आणि शिक्षण देणे हे आमचे प्राधान्य असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. आज देशभरात गरिबांसाठी चार कोटींहून अधिक पक्की घरं बांधली गेली आहेत. आदिवासींसाठी त्यांच्या इच्छेनुसार घरे बांधण्यात आली आहेत असंही त्यांनी सांगितलं.
व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिटच्या 20 वर्षांच्या प्रवासाची आठवण करून देत तत्कालीन केंद्र सरकार सहकार्य केले नाही, असा आरोप नरेंद्र मोदी यांनी केला. आज जग व्हायब्रंट गुजरातचे यश पाहत आहे, परंतु तत्कालीन केंद्र सरकारने गुजरातच्या विकासाबाबत उदासीनता दाखवली, तेव्हा अशा वातावरणात व्हायब्रंट गुजरातचे आयोजन करण्यात आले होते, असे मोदी यांनी सांगितले.
"तत्कालीन सरकारच्या केंद्रीय मंत्र्यांनी कार्यक्रमात सहभागी होण्यास नकार दिला आणि परदेशी गुंतवणूकदारांना गुजरातमध्ये गुंतवणूक न करण्याची धमकी दिली. तरीही, गुंतवणूकदार आले आणि त्यांना कोणतेही प्रोत्साहन दिले गेले नाही. गुंतवणूकदार केवळ सुशासन, न्याय्य प्रशासन, विकासाचे समान वितरण आणि पारदर्शक सरकारमुळे आले", असे नरेंद्र मोदी म्हणाले. याशिवाय, मागील केंद्र सरकार गुजरातच्या प्रगतीकडे राजकारणाच्या नजरेतून पाहत असल्याचा आरोप मोदींनी केला.