'महिलांनी संस्कारी मुलांना जन्म द्यावा, अन्यथा निपुत्रिक राहावं'
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2018 08:39 PM2018-06-14T20:39:20+5:302018-06-14T20:41:09+5:30
भाजपा आमदाराचं बेताल विधान
भोपाळ: भाजपाचे नेते आणि वादग्रस्त विधानं हे जणू काही समीकरणच झालं आहे. मध्य प्रदेशातील एका भाजपा आमदारानं महिलांना अजब सल्ला दिला आहे. 'महिलांना मुलांना जन्म द्यायचा असल्यास त्यांनी संस्कारी मुलांना जन्म द्यावा, अन्यथा निपुत्रिक राहावं,' असं विधान मध्य प्रदेशच्या गुना मतदारसंघाचे आमदार पन्नालाल शाक्य यांनी केलं आहे. त्यांच्या या विधानामुळे मोठा वाद झाला आहे.
मुख्यमंत्री जनकल्याण योजनेअंतर्गत बुधवारी एका कार्यक्रमाला आमदार पन्नालाल शाक्य उपस्थित होते. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना शाक्य यांनी महिलांना संस्कारी मुलांना जन्म देण्याचा अजब सल्ला दिला. 'महिलांना संस्कारी मुलांना जन्म द्यायला हवा. समाजात विकृती पसरवणाऱ्या मुलांना महिलांनी जन्म देऊ नये,' असं अजब विधान शाक्य यांनी केलं. ते ऐवढ्यावरच थांबले नाहीत. तर त्याही पुढे जाऊन, 'संस्कारी मुलांना जन्म देता येत नसेल, तर महिलांना निपुत्रिक राहावं,' असं धक्कादायक वक्तव्य त्यांनी केलं.
भाजपा आमदार पन्नालाल शाक्य यांना काँग्रेसवर निशाणा साधायचा होता. मात्र काँग्रेसवर टीका करताना त्यांनी महिलांना अजब सल्ला दिला. 'काँग्रेसनं गरिबी हटावची घोषणा दिली होती. मात्र त्यांनी गरिबांनाच संपवून टाकलं. काही महिला अशा असतात, ज्या अशा नेत्यांना जन्म देतात,' असं शाक्य म्हणाले. यानंतर पुढे बोलताना, 'महिलांनी संस्कारी मुलांना जन्म द्यावा. अन्यथा निपुत्रिक राहावं,' असं शाक्य म्हणाले.