अंगात आलंया! कोविड टीम येताच महिलांच्या अंगात आत्मा संचारला; थयाथया नाचू लागल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2022 03:16 PM2022-02-11T15:16:48+5:302022-02-11T15:17:16+5:30
आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांवर दगडफेक; चाचणीसाठी वापरली जाणारी किट्सदेखी हिसकावली
जयपूर: देशात आलेली कोरोनाची तिसरी लाट ओसरत चालली आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक घट होत आहे. मात्र कोरोनाचे नवे व्हेरिएंट येण्याचा धोका असल्यानं आरोग्य विभागानं लसीकरण आणि चाचण्यांवर भर दिला आहे. मात्र काही ठिकाणी लोकांच्या मनात असलेल्या गैरसमजांमुळे लसीकरण आणि कोविड चाचणीत अडचणी येत आहेत.
राजसमंद येथे आरोग्य विभागाचं पथक कोविड चाचणी करण्यासाठी पोहोचलं. त्यांना पाहताच महिला अंगात आत्मा संचारल्याचं नाटक करू लागल्या. त्यांनी आरडाओरड आणि दगडफेक सुरू केली. यामुळे घाबरलेल्या पथकानं तिथून पळ काढला. कुंभलगढमधील धानीन ग्राम पंचायतीत हा प्रकार घडला.
आरोग्य विभागाचं पथक बुधवारी मनरेगा साईटवर काम करणाऱ्या महिलांची कोरोना चाचणी करण्यासाठी पोहोचलं. कोविड चाचणीसाठी आवश्यक असणारे नमुने गोळा करण्यासाठी आलेल्या पथकाला पाहून महिलांनी विरोध सुरू केला. त्यांनी कोविड चाचणी करून घेण्यास नकार दिला. मात्र पथकातील कर्मचारी चाचणी करण्यावर ठाम होते. त्यामुळे महिलांनी अंगात आत्मा संचारल्याचं नाटक सुरू केलं. दोन महिलांनी शरीरात आत्मा आल्याचं नाटक करत पथकाला घाबरवलं.
इथून पळून जा असं म्हणत महिलांनी पथकाला भीती घालण्याचा प्रयत्न केला. मात्र तरीही पथक माघार घेत नसल्याचं पाहताच तिथे उपस्थित असलेल्या काही लोकांनी पथकावर दगडफेक सुरू केली. त्यामुळे पथकातील सदस्य पळू लागले. तेव्हा तिथे असलेल्या तरुणांनी त्यांच्याकडे असलेल्या टेस्टिंग किट काढून घेतल्या. यादरम्यान पथकातील काहींना दुखापत झाली. या प्रकरणी अद्याप तरी कोणत्याही प्रकारची तक्रार न मिळाल्याचं चारभुजा पोलीस ठाण्याचे प्रमुख भवानी शंकर यांनी सांगितलं. आरोग्य पथकानं तक्रार नोंदवल्यास कारवाई करू असं शंकर म्हणाले.