कारचोरी रॅकेटमध्ये अडकल्या काँग्रेसच्या महिला आमदार
By Admin | Published: April 15, 2015 01:45 AM2015-04-15T01:45:08+5:302015-04-15T01:45:08+5:30
देशभरात पसरलेल्या कारचोरांच्या टोळीसोबत साटेलोटे असल्याच्या आरोपावरून बोरखोला येथील काँग्रेसच्या आमदार रुमी नाथ यांना आसाम पोलिसांनी मंगळवारी अटक केली.
गुवाहाटी : देशभरात पसरलेल्या कारचोरांच्या टोळीसोबत साटेलोटे असल्याच्या आरोपावरून बोरखोला येथील काँग्रेसच्या आमदार रुमी नाथ यांना आसाम पोलिसांनी मंगळवारी अटक केली. रुमी नाथ यांना सकाळी ७ वाजता आमदार निवासात अटक करण्यात आल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त एस. लाल बरुआ यांनी दिली. दरम्यान, रूमी यांनी आपल्याला फसवण्यात आले असल्याचा दावा केला आहे.
देशभरात ४५५२ कार चोरणारा अनिल चौहान याच्याशी नाथ यांचे साटेलोटे असल्याचा आरोप आहे. चौहानला गेल्या ६ एप्रिलला गुवाहाटीत अटक केले होते. त्याच्या चौकशीदरम्यान रुमी नाथ यांचे नाव उघड झाले.
दरम्यान, आमदार रुमी नाथ यांनी २०१२ साली इस्लाम धर्म स्वीकारून व पहिल्या पतीला घटस्फोट न देता झाकीर यांच्यासोबत विवाह केला होता. त्यानंतर जुलै २०१२ मध्ये करीमगंज येथील एका हॉटेलमध्ये संतप्त जमावाने या दाम्पत्यावर हल्ला केला होता. गेल्या वर्षी दोघेही विभक्त झाले व तेव्हापासून स्वतंत्र राहत आहेत. (वृत्तसंस्था)