इच्छा तिथे मार्ग! एक मुलगा IPS तर दुसरा IRS; 60 व्या वर्षी 'आई' पूर्ण करतेय स्वतःचं शिक्षण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2022 04:25 PM2022-03-08T16:25:48+5:302022-03-08T16:29:30+5:30
Womens day 2022 And Kausalya Bansal : इयत्ता आठवीपर्यंत शिक्षण घेतलेल्या कौसल्या बन्सल आता स्वतः पुढचं शिक्षण घेत आहेत.
नवी दिल्ली - प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर अनेक अशक्य वाटणाऱ्या गोष्टी या सहज शक्य करता येतात. अशीच एक कौतुकास्पद घटना आता समोर आली आहे. छत्तीसगडमधील महासमुंद येथील कौसल्या बन्सल (Kausalya Bansal) या गृहिणीची अशीच गोष्ट आहे. या महिलेनं आपल्या मुलांना शिक्षण देण्यासाठी कठोर परिश्रम घेतले. स्वतःची स्वप्नं बाजूला ठेवत मुलांना नव्या भविष्याची स्वप्नं दाखवली. मुलांनीही आपल्या आई-वडिलांचं स्वप्न साकार केलं. यूपीएससी आणि सीजी पीएससी परीक्षांमध्ये यश मिळवल्यानंतर त्यांची मुलं आता आयआरएस, आयपीएस आणि डेप्युटी कलेक्टर यासारख्या पदांवर विराजमान झाली आहेत. सुरुवातीच्या टप्प्यात इयत्ता आठवीपर्यंत शिक्षण घेतलेल्या कौसल्या बन्सल आता स्वतः पुढचं शिक्षण घेत आहेत.
महासमुंद जिल्ह्यातल्या बसना येथील रहिवासी असलेल्या कौसल्या बन्सल यांचा 1974 मध्ये वयाच्या 17 व्या वर्षी विवाह झाला. त्यावेळी त्याचं शिक्षण इयत्ता आठवीपर्यंत झालं होतं. पाच भाऊ आणि पाच बहिणींमध्ये मोठ्या बहिणीचं लग्न झाल्यानंतर घराची सर्व जबाबदारी कौसल्या यांच्यावर आली होती त्यामुळे त्या पुढे शिकू शकल्या नाहीत. त्यांच्यावर लहान भावंडांचा सांभाळ करण्याबरोबरच घरातील कामांचा भार होता. अशा स्थितीतही अभ्यासाची आवड त्यांच्या मनात कायम होती. पण लग्नानंतरही हे स्वप्न केवळ स्वप्नच राहिलं होतं. पण त्यांनी ही स्वप्नं आपल्या मुलांना चांगलं शिक्षण देऊन पूर्ण करण्याचा प्रयत्न केला.
आई होताच मुलांच्या शिक्षणाबाबत कोणतीही तडजोड करणार नाही, असा निर्धार त्यांनी केला होता. यात त्यांना त्यांच्या पतीने मोलाची साथ दिली. भलेही त्याचं शिक्षण आठवीपर्यंत झालं असलं तरी त्यांनी मुलांना खूप शिकवलं. कौसल्या बन्सल यांना चार मुलं आहेत. मुलांना इंग्रजीतून शिकवता येत नाही, असं दिसल्यावर त्यांनी मुलांना हिंदी माध्यमातून शिकवलं. मुलांचं भवितव्य हेच आपलं भविष्य आहे, असं त्यांनी मानलं. "मला तीन मुलं आणि एक मुलगी आहे. लग्नानंतर तीन वर्षांनी माझ्या मोठ्या मुलाचा जन्म झाला. पाच वर्षांनी दुसऱ्या मुलाचा, सात वर्षांनी तिसऱ्या मुलाचा जन्म झाला. धाकट्या मुलाच्या आगमनानंतर 9 वर्षांनी घरात मुलीचा जन्म झाला. आई-वडिलांचं स्वप्न स्वतःचं मानून प्रत्येकाने कठोर परिश्रम केले" असं कौसल्या यांनी सांगितलं.
"माझा मोठा मुलगा श्रवण बन्सल रायपूरमधल्या जीएसटी कार्यालयात आयुक्तपदावर कार्यरत आहे. मधला मुलगा मनीष बन्सल हा वडिलांचा व्यवसाय सांभाळतो. तो एक यशस्वी व्यापारी आहे. धाकटा मुलगा त्रिलोक बन्सल आयपीएस (IPS) आहे. तो गौरेला पेंद्रा मारवाही येथे एसपी पदावर कार्यरत आहे. सर्वात धाकटी मुलगी शीतल बन्सल डेप्युटी कलेक्टर असून ती सध्या गारियाबंद छुरा येथे एसडीएम पदावर कार्यरत आहे" असं म्हटलं आहे. मुलांनी मिळवलेल्या यशामुळे कौसल्या यांना आपण आपली स्वप्नं मुलांच्या माध्यमातून पूर्ण केल्याबद्दल स्वतःचा अभिमान वाटतो. खूप कमी पालक असे आहेत की ज्यांची मुलं आपल्या आई-वडिलांचं स्वप्न पूर्ण करतात" असं कौसल्या यांनी सांगितलं. मुलं शिकली म्हणून कौसल्या थांबल्या नाहीत तर सर्व मुलं सेटल्ड झाल्यावर वयाच्या 60 व्या वर्षी त्यांनी स्वतः दहावीची परीक्षा दिली आणि त्या उत्तीर्णदेखील झाल्या आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.