महिला प्रवेशाचा वाद; शबरीमला यात्रेवर सावट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2018 05:48 AM2018-10-17T05:48:34+5:302018-10-17T05:48:55+5:30
अंमलबजावणीमुळे तणाव : कोर्टाचा आदेश पाळण्याचा तिढा कायम
निलक्कल (केरळ) : शबरीमाला येथील आय्यप्पा मंदिरात महिलांना सरसकट प्रवेश देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची अंमलबजावणी करण्यावरून निर्माण झालेला तिढा सोडविण्यासाठीच्या बैठकीत तोडगा निघू न शकल्याने बुधवारपासून सुरू होणाऱ्या यात्रेवर तणावाचे सावट आहे.
मंदिराचे व्यवस्थापन करणारे त्रावणकोर देवस्थान मंडळ, मंदिरातील मुख्य पुजारी व हे मंदिर ज्यांनी बांधले त्या पूर्वीच्या पंडालम राजघराण्याचे प्रतिनिधी यांच्यातील बैठक निष्फळ ठरली. मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी बोलावलेल्या बैठकीला मंदिराचे पुजारी व राजघराण्याचे प्रतिनिधी गेले नव्हते.
महिनाभराची यात्रा राजघराण्याच्या पूजेने सुरू होते; परंतु महिलांच्या प्रवेशास विरोध करणारे मुख्य पुजारी बुधवारी पूजेसाठी न येण्याची शक्यता आहे.
महिलांचा प्रवेश रोखण्याचा भक्त संघटनांनी चंग बांधल्याने मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
महिलांच्या प्रवेशाबाबत निकालापूर्वीची स्थिती कायम ठेवावी यावर आम्ही ठाम आहोत. निर्णय देवस्थान मंडळाने घ्यायचा आहे, असे सांगून राजघराण्याचे प्रतिनिधी शशीकुमार वर्मा बैठकीला गेले. बाहेर आल्यावर त्यांनी सांगितले की, न्यायालयात फेरविचार याचिका करण्याचा आम्ही आग्रह धरला; पण त्यावर १९ आॅक्टोबर रोजी बोलू, असे देवस्थानचे म्हणणे होते.बैठकीतून काही निष्पन्न होणार नाही हे नक्की झाल्याने आम्ही उठून बाहेर आलो.
मुख्यमंत्री विजयन यांनी स्पष्ट केले की, फेरविचार याचिका दाखल केली जाणार नाही व कोणालाही मंदिर प्रवेशास प्रतिबंध करणार नाही. सर्व भाविकांना मंदिरात जाऊन दर्शन घेण्यासाठी सोयीसुविधा दिल्या जातील.
न्यायालयाच्या निकालाविरुद्ध केरळमध्ये अनेक मोर्चे निघालेले आहेत. सरकार निकालाचे पालन करणार असे म्हणत असले तरी भाजप व काँग्रेस यांनी भक्तांच्या व प्रवेशबंदीच्या बाजूने उभे राहण्याचे ठरविल्याने निर्णय अमलात आणताना अडचणी येऊ शकतात. पोलीस अधीक्षक तिथे तळ ठोकून आहेत.
महिलांना अडविणे सुरू
निलक्कलपासून १५ किमीवर असलेल्या पंबा येथून शबरीमालाचा डोंगर पायी चढण्यास सुरुवात होते. मंगळवारीच अनेक भाविक तिथे महिलांची वाहने अडवून त्यांना परत पाठविताना दिसत होते. महिला पत्रकारांनाही अडविले गेले. विशेष पोलिसांच्या डोळ्यादेखत हे सुरू होते.