खतना : महिलांचे जीवन केवळ लग्न आणि पतीपुरते मर्यादित नाही - सर्वोच्च न्यायालय
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2018 06:09 PM2018-07-30T18:09:41+5:302018-07-30T18:10:02+5:30
सर्वोच्च न्यायालयाने दाऊदी बोहरा मुस्लिम समाजात प्रचलित असलेल्या अल्पवयीन मुलींच्या खतना प्रथेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
नई दिल्ली - सर्वोच्च न्यायालयाने दाऊदी बोहरा मुस्लिम समाजात प्रचलित असलेल्या अल्पवयीन मुलींच्या खतना प्रथेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. खतनाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की केवळ महिलांना लग्न करायचे असल्याने त्यांची खतना करता येणार नाही. महिलांचे जीवन केवळ लग्न आणि पती यापुरते मर्यादित नाही.
खतना प्रथेवर पूर्णपणे बंदी घालण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून मागणी करण्यात आली आहे. त्यावर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने या प्रथेवर ताशेरे ओढले. विवाहाशिवाय महिलांच्या अन्य जबाबदाऱ्याही असतात. अशा प्रकारची प्रथा हे महिलांच्या खाजगी जीवनाच्या स्वातंत्र्याचे उल्लंघन आहे. ही बाब लैंगिक संवेदनशीलतेशी निगडित आहे, तसेच आरोग्यासाठीही धोकादायक ठरू शकते, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले.