Budget 2020: मोदी सरकार मुलींच्या लग्नाचं वय बदलणार? निर्मला सीतारामन यांनी दिले संकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2020 13:18 IST2020-02-01T13:16:49+5:302020-02-01T13:18:42+5:30
मुलींचं लग्नाचं वय वाढवलं जाण्याची शक्यता; अर्थसंकल्प सादर करताना सीतारामन यांचे संकेत

Budget 2020: मोदी सरकार मुलींच्या लग्नाचं वय बदलणार? निर्मला सीतारामन यांनी दिले संकेत
नवी दिल्ली: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बजेट सादर करताना मुलींच्या लग्नाचं वयात बदल करण्याचे संकेत दिले आहेत. मुलींच्या पोषणाच्या दृष्टीकोनातून त्यांचं लग्नाचं वय बदलण्यात येईल, असे संकेत सीतारामन यांनी दिले. यासाठी एका कृती दलाची स्थापना करण्यात येणार असून त्यांच्याकडून याबद्दलचा आढावा घेण्यात येईल. त्यामुळे सरकारकडून लवकरच मुलींच्या लग्नाचं वय वाढवण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो.
मुलींचे विवाह, त्यांचं पोषण आणि आरोग्यावर निर्मला सीतारामन यांनी बजेट सादर करताना भाष्य केलं. 'आधी वयाच्या १५ व्या वर्षी मुलींचे विवाह व्हायचे. १९७८ मध्ये शारदा कायदा आणून त्यात बदल करण्यात आला. यानंतर मुलींच्या लग्नाचं वय १८ वर्षे करण्यात आलं. मुलींच्या शारीरिक पोषणाच्या दृष्टीनं हा निर्णय घेण्यात आला. याच अनुषंगानं सरकारकडून एका कृती दलाची स्थापना करण्यात आली आहे. त्यांच्याकडून याबद्दलचा पुनर्विचार केला जाईल,' असं सीतारामन यांनी म्हटलं.
पोषणाशी संबंधित योजनांवर ३५ हजार कोटी रुपये खर्च करण्यात येणार असल्याचं सीतारामन यांनी जाहीर केलं. 'मातांच्या आरोग्यासाठी पोषण अतिशय गरजेचं आहे. लहान मुलांसाठीदेखील हे अत्यंत महत्त्वाचं आहे. याबद्दलची माहिती देण्यासाठी अंगणवाडी सेविकांना स्मार्टफोन देण्यात आले आहेत. सहा लाखांपेक्षा अधिक अंगणवाडी सेविका पोषण अभियानावर काम करत आहेत,' असं अर्थमंत्र्यांनी म्हटलं.
बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ योजनेला उल्लेखनीय यश मिळालं आहे. शाळेत जाणाऱ्या मुलींचं प्रमाण वाढलं आहे. हे प्रमाण मुलांपेक्षाही जास्त आहे. मुली कोणत्याही क्षेत्रात मुलांपेक्षा कमी नाहीत, असं सीतारामन पुढे म्हणाल्या.