महिलांचा पैसा येऊ लागला बँकांत; खाती वाढली, ठेवीही ३९ टक्क्यांवर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2025 05:50 IST2025-04-07T05:48:35+5:302025-04-07T05:50:45+5:30
केंद्राच्या अहवालातील माहिती; ४२ टक्के खाती ग्रामीण महिलांची.

महिलांचा पैसा येऊ लागला बँकांत; खाती वाढली, ठेवीही ३९ टक्क्यांवर
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : देशात ३९.२ टक्के बँक खाती महिलांच्या नावावर आहेत, ग्रामीण महिलांच्याबँक खात्याचे प्रमाण ४२.२ टक्के आहे. ही माहिती एका सरकारी अहवालातून समोर आली आहे. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने रविवारी ‘भारतामधील महिला आणि पुरुष २०२४ : निवडक निर्देशक आणि आकडेवारी’ या शीर्षकाखाली आपल्या प्रकाशनाची २६ वी आवृत्ती रविवारी जाहीर केली.
यात भारतामधील लिंग आधारित स्थितीचे व्यापक अवलोकन केलेले आहे. लोकसंख्या, शिक्षण, आरोग्य, आर्थिक सहभाग आणि निर्णय प्रक्रियेत सहभाग, आदी घटकांच्या आधारे पुरुष व महिलांचे प्रमाण मांडले आहे. विविध मंत्रालये आणि संघटनांकडून यासाठी माहिती मागविली होती. वर्ष २०२१-२२, २०२२-२३ आणि २०२३-२४ दरम्यान उत्पादन, व्यापार आणि इतर सेवा क्षेत्रांमध्ये महिलांच्या नेतृत्वाखालील उपक्रमांचे प्रमाण वाढले आहे.
महिलांची डिमॅट खाती २.७७ कोटींवर
३१ मार्च २०२१ पासून ३० नोव्हेंबर २०२४ पर्यंत डिमॅट खाती चारपट वाढून ३.३२ कोटींवरून १४.३० कोटींवर पोहोचली आहेत. पुरुष खातेदारांचे प्रमाण महिलांपेक्षा अधिक आहे. पुरुषांची डिमॅट खाती २०२१ मध्ये २.६५ कोटी इतकी होती. ती २०२४ मध्ये ११.५३ कोटींवर पोहोचली. याच कालावधीत महिलांच्या डिमॅट खात्यांंची संख्या ६६.७ लाखांवरून २.७७ कोटींवर पोहोचली.