महिलेची आत्महत्या, जात पंचायतीची दारु पार्टीची अजब शिक्षा
By admin | Published: March 16, 2016 01:02 PM2016-03-16T13:02:36+5:302016-03-16T13:17:00+5:30
लित युवकाबरोबर विवाहबाह्य संबंध ठेवल्याचा ठपका ठेऊन जात पंचायतीने शिक्षा सुनावली म्हणून मध्यप्रदेशात एका महिलेने आत्महत्या केली.
Next
ऑनलाइन लोकमत
भोपाळ, दि.१६ - दलित युवकाबरोबर विवाहबाह्य संबंध ठेवल्याचा ठपका ठेऊन जात पंचायतीने शिक्षा सुनावली म्हणून मध्यप्रदेशातील बाजारुआ खारी गावातील एका महिलेने आत्महत्या केली. हिंदुस्थान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार जात पंचायतीने या महिलेवर दलित युवकाबरोबर विवाहबाहय संबंध असल्याचा आरोप केला होता.
चार मुलांची आई असणा-या या ३६ वर्षीय महिलेने रहात्या घरातील पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. या महिलेच्या पतीची घराबाहेर मद्याची पार्टी चालू असताना तिने आत्महत्या करुन जीवन संपवले. जात पंचायतीच्या आदेशावरुन तिच्या पतीने ही पार्टी ठेवली होती.
पापाचे प्रायश्चित म्हणून जात पंचायतीने या महिलेला आणि तिच्या कुटुंबाला वेगवेगळया प्रकारची शिक्षा सुनावली होती. पाच हजार रुपये दंड भर, गंगा नदीत आंघोळ कर, गावातील तीस घरांमध्ये मद्य पार्टी द्या त्याशिवाय या महिलेला गावातील शिव मंदिराला लोळून प्रदक्षिणा घालण्याचे आदेश दिले होते. गावातील काही जणांनी फक्त या महिलेवर आरोप केला म्हणून जात पंचायतीने तिला इतकी क्रूर शिक्षा सुनावली होती.