आश्चर्य...! 133 गावांमध्ये तीन महिन्यांत 216 प्रसूती; त्यात एकही मुलगी नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2019 12:03 PM2019-07-19T12:03:50+5:302019-07-19T12:04:35+5:30
पुरुषांच्या तुलनेत महिलांची संख्या दिवसेंदिवस घटत असल्याने केंद्र सरकार ‘बेटी बचाओ बेटी पढ़ाओ’ सह अनेक योजना आणि जनजागृती करत असते.
उत्तराखंडच्या उत्तरकाशीमध्ये एक खळबळ उडवून देणारा प्रकार समोर आला आहे. या भागातील 133 गावांमध्ये गेल्या तीन महिन्यात 216 प्रसूती झाल्या, मात्र यामध्ये एकही मुलगी जन्माला आली नसल्याने सर्वच चक्रावले आहेत.
पुरुषांच्या तुलनेत महिलांची संख्या दिवसेंदिवस घटत असल्याने केंद्र सरकार ‘बेटी बचाओ बेटी पढ़ाओ’ सह अनेक योजना आणि जनजागृती करत असते. मात्र, या प्रयत्नांवर नागरिकांकडून पाणी फेरले जात आहे. सरकारी आकड्यांमध्ये ही परिस्थिती समोर आल्याने जिल्हा प्रशासनाने या प्रकाराची चौकशी सुरू केली आहे.
आरोग्य विभाग सर्व जिल्ह्यांतील गावांमध्ये हॉस्पिटल किंवा घरगुती प्रसूतीची नोंद ठेवत असतो. गेल्या एप्रिल ते जून महिन्यात उत्तरकाशी जिल्ह्यात विविध गावांमध्ये झालेल्या प्रसूत्यांचा अहवाल समोर आला आहे. यामुळे अधिकारीही संभ्रमात पडले आहेत.
या अहवालानुसार जिल्ह्यातील 133 गावांमध्ये तीन महिन्यांत एकूण 216 प्रसूती झाल्या, मात्र धक्कादायक बाब म्हणजे यामध्ये एकही मुलगी जन्माला आलेली नाही. रविवारी गंगोत्रीचे आमदार गोपाल रावत आणि जिल्हाधिकारी डॉ. आशिष चौहाण यांनी या गावांतील आशा कर्मचाऱ्यांशी बैठक घेतली. त्यांच्याकडून या प्रकरणाची माहिती घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. या सर्व गावांना रेड झोनमध्ये टाकण्य़ात आले आहे. तसेच आशा कार्यकर्त्यांनी पाठविलेली यादी पोर्टलवर नियमित अपलोड करण्यास सांगितले आहे.