खुर्चीवर बसणार नाही, ओम बिर्ला नाराज? वारंवार अवमान होत असल्याने दुखावले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2023 08:33 AM2023-08-03T08:33:19+5:302023-08-03T08:33:41+5:30
संसदेत आज अशी घटना घडली, ज्याची कोणीही कल्पना केली नव्हती. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आज संसदेत उपस्थित असतानाही लोकसभेचे कामकाज चालविण्यास नकार दिला.
संजय शर्मा -
नवी दिल्ली : लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी खासदारांच्या वर्तणुकीत सुधारणा होईपर्यंत व त्यांनी संसदेच्या प्रतिष्ठेचे पालन करेपर्यंत लोकसभेत आपल्या खुर्चीवर बसण्यास नकार दिला आहे. अध्यक्षांच्या खुर्चीचा वारंवार अवमान होत असल्यामुळे ते दुखावले आहेत.
संसदेत आज अशी घटना घडली, ज्याची कोणीही कल्पना केली नव्हती. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आज संसदेत उपस्थित असतानाही लोकसभेचे कामकाज चालविण्यास नकार दिला. विरोधक वारंवार गदारोळ करीत असल्यामुळे व लोकसभेच्या कामकाजात अडथळा येत असल्यामुळे आपण दुखावलो आहोत. जोपर्यंत खासदारांच्या वर्तणुकीत सुधारणा होत नाही आणि ते संसदेच्या प्रतिष्ठेचे पालन करीत नाहीत, तोपर्यंत आपण लोकसभेत जाणार नाहीत, असे त्यांनी जाहीर केले.
सूत्रांनी सांगितले की, पंतप्रधान मोदी यांनी ओम बिर्ला यांची नाराजी योग्य ठरवत सरकारमधील मंत्र्यांना त्यांची नाराजी दूर करण्याचे निर्देश दिले.
का उचलले पाऊल?
मंगळवारी दिल्ली सेवा संबंधी विधेयकाला विरोध करताना विरोधी पक्षांच्या खासदारांनी लोकसभा अध्यक्षांच्या आसनाकडे कागद फेकले व वेलमध्ये जोरदार घोषणाबाजी केली. ओम बिर्ला यांनी वारंवार इशारा देऊनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत होते. असे वागणे योग्य नाही. यावर चर्चा करण्यासाठी योग्य संधी देणार आहे, असेही बिर्ला सांगत होते. परंतु, विरोधी खासदार ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते.
तुमचे हे वागणे संपूर्ण देश पाहत आहे. अशा प्रकारचे वर्तन सभागृहात योग्य नाही, असेही बिर्ला म्हणत होते. परंतु, विरोधी खासदारांनी त्यांचे म्हणणे ऐकले नाही.
अखेर आपल्या म्हणण्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे व अध्यक्षांच्या खुर्चीकडे कागद फेकल्यामुळे दुखावलेल्या ओम बिर्ला यांनी हे पाऊल उचलले आहे.