‘त्यांना घेरून काम फत्ते करा’

By admin | Published: November 5, 2016 06:00 AM2016-11-05T06:00:23+5:302016-11-05T06:25:48+5:30

सिमीच्या आठ जणांच्या एनकाऊंटरवरून सुरू झालेल्या वादात आता आणखी भर पडली

'Work around them' | ‘त्यांना घेरून काम फत्ते करा’

‘त्यांना घेरून काम फत्ते करा’

Next


भोपाळ : सिमीच्या आठ जणांच्या एनकाऊंटरवरून सुरू झालेल्या वादात आता आणखी भर पडली आहे. सोशल मीडियातील एका आॅडिओने चर्चेला तोंड फोडले आहे. ‘त्यांना घेरून काम फत्ते करा’ अशी चर्चा या आॅपरेशनमध्ये सहभागी असलेल्या सुरक्षारक्षकांत झाल्याची ही आॅडिओ टेप आहे. या टेपमुळे मध्य प्रदेश सरकार अडचणीत आले आहे.
भोपाळच्या तुुरुंगातून पळून गेल्यानंतर या आठ जणांचे एन्काऊंटर करण्यात आले होते. या आॅडिओ टेपमध्ये स्पष्ट ऐकू येत आहे की, दोन जणांतील संवादात एक व्यक्ती दुसऱ्याला फायरिंगचे आदेश देत आहे. या पोलिसाला सावध राहण्याच्या सूचनाही देण्यात येत आहेत. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलीस टीमशी संवाद साधण्यासाठी वायरलेसऐवजी फोनचा उपयोग करण्याचेही यात सुचविण्यात आले आहे. याबाबत बोलताना पोलीस अधीक्षक अनुराग शर्मा म्हणाले की, या सर्व बाबींचा तपासात समावेश करण्यात आला आहे. आपण अद्याप ही क्लिप ऐकली नाही. दरम्यान, पोलीस महानिरीक्षक योगेश चौधरी म्हणाले की, आॅडिओचे हे प्रकरण तपासासाठी सीआयडीकडे पाठविण्यात येईल.
या दोन्ही आॅडिओ टेप नऊ मिनिटांच्या आहेत. यातील काही संभाषणात असेही म्हटले आहे की, ‘पटेलसाहब, निपटा दो’, ‘उन्हे जल्दी खत्म कर दो.’ काही जणांचे एनकाऊंटर करण्यात आल्यानंतर या टीममधील कर्मचाऱ्यांनी एकमेकांचे अभिनंदन केल्याचेही क्लिपमधून ऐकण्यास मिळत आहे. ‘पाच जणांना मारले आहे, तिघांचे आॅपरेशन सुरू आहे,’ असेही या क्लिपमध्ये म्हटले आहे. ‘गो अहेड, बिलकूल नहीं पिछे हटना है. घेर के करो पुरा काम तमाम,’असेही ऐकू येते.
दोन-तीन अ‍ॅम्बुलन्स पाठविण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. याचवेळी एका जणाचा असाही आवाज येत आहे की, ‘कोई जिंदा न रहना चाहिए’, ‘सर्व जण मारले गेले. एनकाऊंटर यशस्वी झाले. आतापर्यंत मीडियाही पोहोचला नसेल. मीडियातही दम नाही,’ असाही आवाज या क्लिपमधून ऐकावयास मिळत आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
>मुख्यमंत्र्यांनी दिले न्यायालयीन चौकशीचे आदेश
भोपाळच्या तुरुंगातून सिमीचे आठ जण पळाल्याच्या आणि त्यांच्या कथित एन्काऊंटर प्रकरणाच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिले आहेत. सरकारने स्पष्ट केले आहे की, ही चौकशी मध्यप्रदेश उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश एस.के. पांडे हे करतील. सिमीचे हे कार्यकर्ते ३०-३१ च्या मध्यरात्री तुरुंगातून पळाले होते.
फरार होण्यापूर्वी सिमी कार्यकर्त्यांनी येथील सुरक्षारक्षक रमाशंकर यादव यांची हत्या केली होती. ३१ आॅक्टोबर रोजी भोपाळच्या बाहेरच्या परिसरात मणिखेडा पठार येथे पोलिसांच्या एन्काऊटरमध्ये हे आठ जण मारले गेले होते.यानंतर पोलीस आणि राज्याच्या गृहमंत्र्यांचे परस्पर विरोधी वक्तव्ये आली होती. त्यामुळे ही चकमक खोटी असल्याचे आरोप होऊ लागले आहेत. उच्च न्यायालयात याबाबत एक जनहित याचिका दाखल झाली असून, न्यायालयीन चौकशीची मागणी यात करण्यात आली आहे.

Web Title: 'Work around them'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.