अर्थसंकल्पाच्या छपाईचे काम सुरू

By Admin | Published: January 20, 2017 06:11 AM2017-01-20T06:11:31+5:302017-01-20T06:11:31+5:30

उत्तर प्रदेशसह पाच राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थसंकल्प पुढे ढकलावा

The work of budget printing continues | अर्थसंकल्पाच्या छपाईचे काम सुरू

अर्थसंकल्पाच्या छपाईचे काम सुरू

googlenewsNext


नवी दिल्ली : उत्तर प्रदेशसह पाच राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थसंकल्प पुढे ढकलावा, या विरोधी पक्षांच्या मागणीवर निवडणूक आयोगाने अद्याप निर्णय दिला नसला तरी अर्थसंकल्प ठरल्याप्रमाणे १ फेब्रुवारी रोजीच मांडायचा आहे, हे गृहित धरून वित्त मंत्रालयाने अर्थसंकल्पाच्या पुस्तकांची छपाई सुरू केली आहे.
वित्त मंत्रालयाच्या बजेट प्रिटिंग प्रेसमध्ये गुरुवारी दुपारी वित्तमंत्री अरुण जेटली यांच्या हस्ते झालेल्या पारंपरिक ‘हलवा’ समारंभाने अर्थसंकल्पाशी निगडित दस्तावेजांच्या छपाईचे काम सुरू झाले. अर्थसंकल्पाची छपाई सुरू होणे, हा अर्थसंल्पातील सर्व तरतुदींना अंतिम स्वरूप देण्यात आले आहे आणि आता त्यात कोणताही बदल संभवत नाही, याचेही द्योतक असते.
दि. २६ नोव्हेंबर १९४७ रोजी तत्कालिन वित्तमंत्री आर. के. षण्मुगम चेट्टी यांनी स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प सादर केला, तेव्हापासून ‘हलवा’ समारंभाने अर्थसंकल्पाची छपाई सुरू करण्याची प्रथा रुढ झाली आहे. यावेळी बजेट प्रिंटिंग प्रेसमध्ये एका मोठ्या कढईत हलवा तयार केला जातो आणि तो अर्थसंकल्पाच्या छपाई कामाशी संबंधित सर्व कर्मचाऱ्यांना वित्तमंत्र्यांच्या हस्ते वाटला जातो. ‘हलवा समारंभा’ने या छपाई कामाशी संबंधित सुमारे १०० कर्मचाऱ्यांच्या ‘बंदिवासा’चीही सुरुवात होते. अर्थसंकल्प संसदेत मांडला जाईपर्यंत तो कोणत्याही प्रकारे फुटू नये, यासाठी त्याची गोपनीयता राखणे हे अत्यंत महत्त्वाचे असते. यासाठीच छपाई काम सुरू झाल्यावर त्याच्याशी संबंधित कर्मचाऱ्यांना प्रेसमध्येच ‘बंदिवासा’त ठेवले जाते. हे कर्मचारी ‘हलवा’ समारंभानंतर प्रेसमध्ये गेले की वित्तमंत्र्यांनी अर्थसंकल्प संसदेत सादर करेपर्यंत त्यांना प्रेसमधून बाहेर जाऊ दिले जात नाही.
>उद्या माहिती देणार
निवडणुका जाहीर झालेल्या राज्यांच्या निवडणुकांमुळे २0१२ साली २८ फेब्रुवारीऐवजी १६ मार्च रोजी यूपीए सरकारने अर्थसंकल्प उशिरा मांडला होता. त्यासंबंधीची माहिती निवडणूक आयोगाने केंद्र सरकारकडे मागितली आहे.
कोणत्या परिस्थितीत २0१२ साली अर्थसंकल्प उशिरा मांडला,
त्याची माहिती केंद्राने उद्या, शुक्रवारपर्यंत आयोगाला सादर करायची आहे.

Web Title: The work of budget printing continues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.