रवींद्र भवनाच्या कामाला प्रतिक्षा कोमुनीदाद ठरावाची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2023 06:24 PM2023-04-14T18:24:55+5:302023-04-14T18:26:01+5:30
बार्देश तालुक्यासाठी म्हापश्यातील रवींद्र भवानासाठी कुचली येथे निवडण्यात आलेल्या जागेत भवनाची उभारणी करण्यासाठी आराखडा तयार करून कला आणि सांस्कृतीय संचालनालयाकडे सादर करण्यात आला आहे.
म्हापसा : बार्देश तालुक्यासाठी म्हापश्यातील रवींद्र भवानासाठी कुचली येथे निवडण्यात आलेल्या जागेत भवनाची उभारणी करण्यासाठी आराखडा तयार करून कला आणि सांस्कृतीय संचालनालयाकडे सादर करण्यात आला आहे. या संबंधीची माहिती म्हापशाचेआमदार उपसभापती जोशुआ डिसोजा यांनी दिली.
सुमारे सव्वा महिन्यापूर्वी डिसोझा यांनी मंत्री गोविंद गावडे यांच्या समवेत कुचेली येथील नियोजीत जागेची पाहणी केली होती. कुचेली कोमुनी दादने भवानाच्या उभारणीसाठी अंदाजे २० हजार चौरस मीटर जागा देण्याची तत्वता तयारी दर्शवली आहे. मात्र कोमुनीदादनेअद्यापही त्यांची योग्य प्रक्रिया पूर्ण केली नसून जागेला मान्यता देणारा ठरावही मंजूर केला नाही. कोमुनीदादकडून एकदा ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर भवनाच्या प्रस्तावाला गती दिली जाणार असल्याचे डिसोझा म्हणाले. तोपर्यंत आराखडा तयार करुन सादर करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
शहरात नागरिकांच्या मनोरंजनासाठी एकही साधन नसल्याने गेल्या दोन दशकापासून लोकांना भवनाची प्रतिक्षा लागून राहिली आहे. भवनासाठी यापूर्वी काही जागांची पाहणी करण्यात आलेली पण विविध कारणास्तव सदरचे प्रस्ताव बारगळले होते. एक प्रस्ताव तर हरीत लवादात देण्यात आलेल्या आवाहनामुळे अडकला होता. त्यामुळे सध्याच्या या प्रस्तावाला गती मिळेल अशी लोकांची अपेक्षा आहे.