सचिवाच्या सल्ल्याप्रमाणे काम केले!
By admin | Published: October 4, 2015 11:34 PM2015-10-04T23:34:15+5:302015-10-04T23:34:15+5:30
तत्कालीन कोळसा सचिव पी.सी. पारेख यांच्या सल्ल्यानुसार कुमारमंगलम बिर्ला यांच्या हिंदाल्को कंपनीला तालाबिरा-२ कोळसा खाणपट्टा वितरित करण्याची ओडिशाचे मुख्यमंत्री
नवी दिल्ली : तत्कालीन कोळसा सचिव पी.सी. पारेख यांच्या सल्ल्यानुसार कुमारमंगलम बिर्ला यांच्या हिंदाल्को कंपनीला तालाबिरा-२ कोळसा खाणपट्टा वितरित करण्याची ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची विनंती आपण मंजूर केलेली होती आणि त्याची पंतप्रधान कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनीही तपासणी केली होती, असे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी सीबीआयला सांगितले.
हिंदाल्कोला कोळसा खाणपट्टा वाटप न करण्याच्या निर्णयाची समीक्षा करण्याची विनंती पटनायक यांनी आपल्या पत्रातून केली होती आणि त्यांच्या या पत्रामुळेच हे प्रकरण उघडण्यात आले होते, असे मनमोहनसिंग यांनी स्पष्ट केले. ‘पंतप्रधान या नात्याने आपणास पाठविण्यात आलेल्या पटनायक यांच्या १७ आॅगस्ट २००५ रोजीच्या पत्रात मेसर्स हिंदाल्कोच्या महत्त्वपूर्ण प्रकल्पासाठी केवळ आवश्यक असलेली कोळसा लिंकेज उपलब्ध करून देण्याची विनंती करण्यात आलेली होती; परंतु हा कोळसा खाणपट्टा आधीच वाटप करण्यात आलेला होता. अशा वेळी आपण तालाबिरा-२ कोळसा खाणपट्ट्यात हिंदाल्कोला भागीदारी देण्यासाठी मंजुरी का दिली,’ असा प्रश्न तालाबिरा-२ कोळसा खाणपट्टा वाटप घोटाळ्याच्या तपासादरम्यान सीबीआयने मनमोहनसिंग यांना विचारला होता.
हिंदाल्कोला कोळसा खाणपट्टा वाटप न करण्याच्या निर्णयावर फेरविचार करण्यात यावा, अशी विनंती बिर्ला यांनी एका पत्राद्वारे सरकारला केली होती. त्यानंतर पटनायक यांनी निर्णयाची समीक्षा करण्याची विनंती करणारे पत्र लिहिले होते. विशेष न्यायालयाने सीबीआयचा क्लोजर रिपोर्ट स्वीकृत करण्यास नकार देताना मनमोहनसिंग, पारेख, बिर्ला आणि अन्य व्यक्तींना आरोपी म्हणून समन्स जारी केला होता. तथापि, या सर्वांनीच गैरप्रकार झाल्याच्या आरोपाचे खंडन केले होते. (लोकमत न्यूज नेटवर्क)