कामगारांनी एप्रिल महिन्याचा पगार मागितला, कंपनीने कामावरुनच काढलं
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2020 05:16 PM2020-05-19T17:16:28+5:302020-05-19T17:17:21+5:30
देशातील अनेक खासगी कंपन्यांनी कामगारांच्या वेतनात कपात केली आहे, तर काहींनी चक्क कामगारांना नोकरीवरुन काढूनच टाकलं आहे. त्यामुळे, गरीब वर्गातील कामगारांचे मोठे हाल होताना दिसून येत आहे
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात पहिल्या लॉकडाऊनची घोषणा केली, त्याचवेळेस देशातील सर्वच कंपनी आणि उच्चवर्गीयांना कामगार, कर्मचाऱ्यांचे वेतन न कापण्याचे आवाहन केले होते. विशेष म्हणजे केंद्रीय गृहमंत्रालयाने यासंदर्भात एक आदेशही जारी केला होता. त्यामध्ये, कामगार व कर्माचाऱ्यांचे वेतन न कापण्याचे आदेश कंपन्यांना दिले आहेत. मात्र, उत्पादन व सेल दोन्ही नसल्याने कामगारांना पगार न देण्याचं धोरण अनेक कंपन्यांनी सुरु केलं आहे. हरियाणातील एका कंपनीने कामगारांच्या पगारात कपात केल्याने कामगारांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
देशातील अनेक खासगी कंपन्यांनी कामगारांच्या वेतनात कपात केली आहे, तर काहींनी चक्क कामगारांना नोकरीवरुन काढूनच टाकलं आहे. त्यामुळे, गरीब वर्गातील कामगारांचे मोठे हाल होताना दिसून येत आहे. हरियाणाच्या फरीदाबाद येथील एका कंपनीने कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात केली आह. त्यामुळे संतप्त कामगारांनी आक्षेप घेत नाराजी व्यक्त केली. लॉकडाऊन कालावधीत कंपनी बंद असल्याने कामगारांनाही काम देण्याात आले नव्हते. त्यामुळे, कंपनीकडून कामगारांना वेतनही देण्यात आले नाही. मात्र, कामगारांनी वेतन मागितल्यानंतर, कंपनीने चक्क कामगारांना कामावरुन कमी केले आहे. येथील सेक्टर ६ मध्ये रेडीमेड गारमेंट्स बनविणाऱ्या कंपनी शिवालिक लिमिटेडमध्ये ही घटना घडली आहे.
संबंधित कंपनीच्या मेन गेटवर उभे राहुन पगारकपातीबद्दल आवाज उठविणाऱ्या कामगारांनी याबाबत सांगितले की, आम्ही एप्रिल महिन्याचा पगार देण्याची मागणी कंपनीकडे केली आहे. गेल्या महिन्यात आम्ही कसेतरी उधार घेऊन घरं चालवले. मात्र, आता लोकांची उधारी देण्यासाठी आमच्याकडे पैसे नाहीत. त्यातच, कंपनीकडून वेतन देण्यात येत नसून पंतप्रधानांच्या आवाहनाकडेही दुर्लक्ष केलं जात आहे. तर, आम्ही कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याचं पूर्ण वेतन दिलं असून मे महिन्यातही १५ दिवसांचा अॅडव्हान्स पगार देत आहोत. एप्रिल महिन्यातील पगाराबाबत सरकारच्या गाईडलाईनचं अनुकरुन केलं जाईल, असे कंपनीच्या मॅनेजरने म्हटले आहे.