केंद्र सरकारविरोधात कामगारांचा एल्गार, दिल्लीला तीन दिवसीय धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2017 04:29 AM2017-10-03T04:29:58+5:302017-10-03T04:30:16+5:30
किमान वेतनासह विविध १२ प्रमुख मागण्यांसाठी कामगारांच्या सर्व केंद्रीय संघटनांनी ९ ते ११ नोव्हेंबरदरम्यान तीन दिवसीय धरणे आंदोलनाची हाक दिली आहे.
मुंबई : किमान वेतनासह विविध १२ प्रमुख मागण्यांसाठी कामगारांच्या सर्व केंद्रीय संघटनांनी ९ ते ११ नोव्हेंबरदरम्यान तीन दिवसीय धरणे आंदोलनाची हाक दिली आहे. या आंदोलनाच्या पूर्वतयारीसाठी राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या (आरएमएमएस) कार्यालयात नुकतीच एक बैठक झाली. त्यात केंद्र सरकारविरोधात पुकारलेले आंदोलन यशस्वी करण्याचा निर्धार सर्व कामगार नेत्यांनी व्यक्त केला आहे.
केंद्रीय इंटकचे संघटन चिटणीस व आरएमएमएसचे सरचिटणीस गोविंद मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत बँक कर्मचारी संघटनेचे नेते विश्वास
उटगी, आयटकचे नेते सुकुमार
दामले, हिंद मजूर सभेचे संजय वढावकर, सीटूचे नेते पी.एम. वर्तक, इंटकचे राज्य उपाध्यक्ष अनिल गणाचार्य आदी नेते उपस्थित होते.
या बैठकीत दिल्लीला होणारे आंदोलन लक्षवेधी ठरण्यासाठी सर्वच नेत्यांनी कंबर कसण्याचा निर्णय घेतला.
केंद्रीय आंदोलनाचे नियोजन करण्यासाठी केंद्रीय श्रमिक संघटनेने ७ आॅक्टोबरला दुपारी ३ वाजता परळच्या महात्मा गांधी सभागृहात राज्यव्यापी परिषद बोलावली आहे. या परिषदेला केंद्रीय श्रमिक संघटनेच्या कृती समितीचे प्रमुख आणि इंटकचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. जी संजीवा रेड्डी मार्गदर्शन करतील. त्याआधी इंटकच्या राज्य कार्यकारिणीची बैठक ७ आॅक्टोबरलाच फोर्टच्या के.आर. कामा ओरिएंटल इन्स्टिट्यूट सभागृहात सकाळी ११ वाजता पार पडेल.
कमीतकमी १८ हजार रुपये किमान वेतन लागू करा.
सर्व कामगारांना किमान ३ हजार रुपये पेन्शन लागू करा.
सार्वजनिक क्षेत्राचे खासगीकरण थांबवा.
बोनस आणि भविष्य निर्वाह निधी पात्रतेसाठीची जाचक अट दूर करून सर्व कामगारांना या योजनेचा लाभ द्या.
कामगार कायदे सशक्तपणे लागू करा.
बेरोजगारी नष्ट करून बेकार सुशिक्षितांना काम द्या.