कार्यालयांसाठी कार्यकर्त्यांची धावपळ
By admin | Published: September 24, 2014 02:59 AM2014-09-24T02:59:35+5:302014-09-24T02:59:35+5:30
निवडणुकांची लगबग सुरू झाली की, कार्यकर्त्यांच्या बैठकादेखील वाढू लागतात. या वेळी कार्यकर्त्यांची हक्काची जागा म्हणजे निवडणुकीसाठी उभारलेली तात्पुरती कार्यालये
मुंबई : निवडणुकांची लगबग सुरू झाली की, कार्यकर्त्यांच्या बैठकादेखील वाढू लागतात. या वेळी कार्यकर्त्यांची हक्काची जागा म्हणजे निवडणुकीसाठी उभारलेली तात्पुरती कार्यालये. सक्रिय कार्यकर्ते निवडणुकीच्या काळात सकाळपासून रात्रीपर्यंत कार्यालयातच असतात. मात्र सध्या ही कार्यालये शोधण्यासाठी, उभारण्यासाठी कार्यकर्त्यांची धावपळ सुरू आहे.
निवडणुकीच्या दरम्यान सर्वच उमेदवार मतदारसंघामध्ये मुख्य निवडणूक कार्यालय स्थापन करतात. मात्र याचबरोबरीने सर्वच मतदारसंघ मोठे असल्यामुळे त्या - त्या भागात छोटी छोटी कार्यालये स्थापन करण्यात येतात. सर्वच मतदारांशी संपर्क राहावा म्हणून अशा प्रकारच्या तात्पुरत्या स्वरूपाची कार्यालये स्थापन करण्यात येतात. मात्र अजूनही मुंबईमध्ये अशा कार्यालयांसाठी शोधाशोध सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे.
निवडणुकीच्या काळात त्या उमेदवाराचा जनसंपर्क जास्त प्रमाणात वाढतो. यामुळेच उमेदवार विधानसभा मतदारसंघाच्या मध्यभागी असणाऱ्या ठिकाणावर त्यांचे कार्यालय असावे, यासाठी प्रयत्न करीत असतात. एका विधानसभा मतदारसंघातून प्रमुख पक्षाचे ३ ते ४ उमेदवार असतात. या सर्वांनाच मध्यवर्ती ठिकाणी कार्यालय हवे असते. संपर्क कार्यालयांची जागा आता निश्चित झालेली आहे. मात्र उपकार्यालयांसाठी जागा शोधण्यासाठी कार्यकर्त्यांची लगबग सुरू आहे.
उपकार्यालये ही प्रामुख्याने त्या विभागातील मतदारांशी संपर्क राहावा, त्यांना उमेदवाराचे नाव, पक्ष डोळ्यांसमोर राहावा यासाठी उभारली जातात. जागा आणि त्याचे भाडे या मुद्द्यावरून आता कार्यकर्ते वाटाघाटी करताना दिसत आहेत. दक्षिण मुंबई, पश्चिम उपनगरे येथील जागांचे भाडे हे उत्तर आणि पूर्व मुंबई भागातील जागांपेक्षा जास्त आहे.