मोदी सरकारसाठी दिलासादायक बातमी ! भारतामध्ये प्रचंड क्षमता, 2018मध्ये विकासदर असेल 7.3 % - वर्ल्ड बँक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2018 08:04 AM2018-01-10T08:04:44+5:302018-01-10T09:25:22+5:30
देशाच्या आर्थिक स्थितीवरुन वारंवार विरोधकांकडून होणा-या चौफेर टीकेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारला दिलासा देणारी बातमी समोर आली आहे.
नवी दिल्ली - देशाच्या आर्थिक स्थितीवरुन वारंवार विरोधकांकडून होणा-या चौफेर टीकेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारला दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. नुकतेच सेंट्रल स्टॅटिस्टिक्स ऑफिस (CSO)द्वारे जारी करण्यात आलेल्या आकड्यांमध्ये विकासदर घटण्याच्या अंदाजावरुन केंद्रातील मोदी सरकारला विरोधकांनी घेरले होते.
तर दुसरीकडे वर्ल्ड बँकेनं केंद्रातील मोदी सरकारचं कौतुक करत म्हटले आहे की, या महत्त्वाकांक्षी सरकारमध्ये होत असलेल्या व्यापक सुधारणा, उपाययोजनांसहीत जागतिक स्तरावर अन्य उदयोन्मुख अर्थव्यवस्थांच्या तुलनेत भारतात विकासासाठी अधिक क्षमता आहे.
2018 मध्ये भारताचा विकासदर 7.3 टक्क्यांवर असेल, असा अंदाज वर्ल्ड बँकेनं बुधवारी वर्तवला आहे. एवढंच नाही तर वर्ल्ड बँकेच्या मते, पुढील दोन वर्षांमध्ये भारताचा विकासदर 7.5 टक्क्यांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. वर्ल्ड बँकेनं '2018 ग्लोबल इकोनॉमिक प्रॉस्पेक्ट' बुधवारी जारी केले आहे. यानुसार नोटाबंदी व जीएसटीसारख्या निर्णयामुळे सुरुवातीला कित्येक धक्के मिळूनही भारताचा विकासदर 6.7 टक्के असण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
वर्ल्ड बँकेचे डेव्हलपमेंट प्रॉस्पेक्ट्स ग्रुपचे डायरेक्टर आइहन कोसे यांनी सांगितले की, पुढील दशकात भारत जगातील अन्य कोणत्याही उदयोन्मुख अर्थव्यवस्थेच्या तुलनेत उच्च विकासदर प्राप्त करण्याच्या दिशेनं जात आहे. छोट्या सांख्यिकी आकडेवारीवर त्यांचं लक्ष्य नाहीय. यावरुन भारतामध्ये प्रचंड क्षमता असल्याचे दिसत आहे, असेही ते म्हणाले.
दरम्यान, यावेळी कोसे यांनी चीनसोबत भारताची तुलनात करत सांगितले की, चीनच्या अर्थव्यवस्थेची गती मंद आहे आणि वर्ल्ड बँकेला भारत अर्थव्यवस्थेत हळूहळू आपली गती वाढवताना दिसत आहे.
अहवालानुसार, 2017मध्ये चीनचा विकासदर 6.8 टक्के म्हणजे भारताच्या तुलनेत केवळ 0.1 टक्क्यानं अधिक आहे. 2018 मध्ये चीनचा विकासदर 6.4 टक्के असेल असा अंदाज आहे. पुढील दोन वर्षांसाठी चीनच्या विकासदराबाबत वर्तवण्यात आलेल्या /E अंदाजात 6.3 व 6.2 टक्के क्रमशः घट वर्तवण्यात आली आहे. तर गुंतवणूक वाढविण्यासाठी भारताला उपाययोजना कराव्या लागतील.
विकासदर ६.५ टक्क्यांवर येण्याचा केंद्र सरकारचा अंदाज
२०१७-१८ चा जीडीपी ६.५ टक्क्यांवर येण्याचा अंदाज केंद्र सरकारच्या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. खरिपात चांगली पिके आली असली तरी कृषी, उत्पादन क्षेत्रात घट होईल आणि बांधकाम व खनिज कर्म क्षेत्र सकारात्मक राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
केंद्रीय सांख्यिकी व नियोजन विभागाने शुक्रवारी हे अंदाज जारी केले. त्यामध्ये २०१७-१८ या आर्थिक वर्षात देशाचे ढोबळ राष्ट्रीय उत्पादन २०१६-१७ च्या ७.१ टक्क्यांच्या तुलनेत यंदा ६.५ टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. देशाच्या एकूण उत्पादकतेचा निर्देशांक ‘जीव्हीए’ द्वारे मांडला जातो. हा जीव्हीए २०१७-१८ मध्ये मागीलवर्षीच्या ६.६ टक्क्यांच्या तुलनेत ६.१ टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मात्र देशाचे दरडोई उत्पन्न ८२ हजार २६९ रुपयांच्या तुलनेत ८६ हजार ६६० रुपये राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या अंदाजांनुसार २०१८-१९ मध्ये जीडीपी आणखी मजबूत होईल. तो ७ टक्क्यांचा टप्पा पार करू शकेल, असे निती आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. राजीव कुमार यांनी सांगितले.