कडक सॅल्यूट! वय 35 वर्षे पण 165 वेळा केलंय रक्तदान; मोदींकडून झालं कौतुक, म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2023 12:52 PM2023-06-14T12:52:53+5:302023-06-14T13:04:55+5:30
वयाच्या 35 व्या वर्षी सौरभने आतापर्यंत एकूण 165 वेळा रक्त आणि प्लेटलेट्स डोनेट केल्या आहेत.
जगभरात वर्ल्ड ब्लड डोनर डे साजरा केला जात आहे. या विशेष दिवशी ब्लड बँकमध्ये ब्लड डोनेशनसाठी विशेष कॅम्पचं आयोजन करण्यात आलं आहे. याच दरम्यान वाराणसीच्या सिगरा भागातील रहिवासी सौरभ मौर्यचं भरभरून कौतुक केलं जात आहे. कारण वयाच्या 35 व्या वर्षी सौरभने आतापर्यंत एकूण 165 वेळा रक्त आणि प्लेटलेट्स डोनेट केल्या आहेत. याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्याचे कौतुक केले आहे. एवढेच नाही तर इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डनेही त्याच्या कार्याला सलाम केला आहे.
सौरभ मौर्यने सांगितले की, 2007 मध्ये पहिल्यांदा रक्तदान केलं होतं. घरी खोटं बोलून तो आपल्या मित्राच्या कुटुंबीयांना रक्तदान करण्यासाठी गेला होता. त्यानंतर त्याने हे काम करायला सुरुवात केली. पुढे घरच्यांनीही त्याला साथ द्यायला सुरुवात केली आणि मग हा व्यक्ती वॉकिंग ब्लड बँक बनला. आज सौरभच्या टीममध्ये देशातील विविध ठिकाणी 400 हून अधिक वॉलंटियर आहेत, जे मेसेज आणि फोनवर लोकांना रक्त देण्याच्या कामात गुंतलेले आहेत.
सौरभने सांगितले की त्याची आजी गंभीर आजाराने ग्रस्त होती आणि रक्त न मिळाल्याने तिचा मृत्यू झाला. वडिलांकडून ही गोष्ट ऐकल्यानंतर त्याने रक्तदान करण्याचा विचार केला. आज त्याने यासाठी मोठी टीम तयार केली आहे.
सौरभ मौर्यचं नाव इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंदवलं गेलं आहे. 10 वर्षात 100 हून अधिक वेळा रक्तदान केलं आहे. याशिवाय 2018 साली एक पत्र पाठवून पीएम मोदींनी त्यांची केवळ प्रशंसाच केली नाही तर त्याला प्रोत्साहनही दिलं होतं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.