विश्व सांस्कृतिक महोत्सवास यमुनेच्या तटावर थाटात प्रारंभ

By admin | Published: March 12, 2016 03:00 AM2016-03-12T03:00:52+5:302016-03-12T03:00:52+5:30

श्री श्री रविशंकर यांच्या आर्ट आॅफ लिव्हिंग संस्थेच्या भव्य दिव्य विश्व सांस्कृतिक महोत्सवाची सुरुवात शुक्रवारी दिल्लीच्या यमुना तटावर मोठ्या जोमात झाली.

World cultural festival begins on the banks of river Yamuna | विश्व सांस्कृतिक महोत्सवास यमुनेच्या तटावर थाटात प्रारंभ

विश्व सांस्कृतिक महोत्सवास यमुनेच्या तटावर थाटात प्रारंभ

Next

नवी दिल्ली : श्री श्री रविशंकर यांच्या आर्ट आॅफ लिव्हिंग संस्थेच्या भव्य दिव्य विश्व सांस्कृतिक महोत्सवाची सुरुवात शुक्रवारी दिल्लीच्या यमुना तटावर मोठ्या जोमात झाली. जगभरातील कलाकारांची गीते, संगीत, नृत्य यांचा संगम असलेल्या या महोत्सवाने लाखो लोकांना भर पावसातही मंत्रमुग्ध केले. पावसाच्या सरीमुळे कार्यक्रमाची सुरुवात अर्धा तास उशिराने झाली. नादस्वरम हा दक्षिण भारतातील ४0 कलाकारांच्या सनईवादनाचा कार्यक्रम अभूतपूर्व होता. पण त्याचबरोबर १,000 वेदाचार्यांनी तिथे मंत्रोच्चारण केल्याने कार्यक्रमाचे वातावरण भारावून गेले.
त्यानंतर ग्रॅमी पुरस्कारासाठी नामांकित झालेल्या चंद्रिका टंडन यांच्या वाद्यवृंदाचा कार्यक्रम झाला आणि मग महाराष्ट्रातील १५00 कलाकारांचा ढोल ताशा आणि सोबतीला पखवाजवादन. जयपूर आणि लखनौमधील १७00 कलाकारांनी कथ्थक नृत्य सादर करून महोत्सवात वेगळाच रंग भरला. शिवाय तामिळनाडूतील १७00 भरतनाट्यम नर्तक आणि नर्तिका, केरळमधील १३१0 कथकली नर्तक आणि गुजरातमधील १५00 गरबा नर्तक-नर्तिका यांच्यानंतर हिमाचल प्रदेशातील १0५0 नर्तकांमुळे महोत्सव पाहण्यास आलेल्या लाखो लोकांचे पाय आपोआप थिरकू लागले. दिल्लीकरांनीच काय, पण देशभरातील लोकांनी असा नृत्य, संगीत, गीत यांचा असा मिलाफ यापूर्वी अनुभवला नसावा.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या महोत्सवाचे उद्घाटन करताना भारतीय संस्कृती आणि जगभरातील विविध देशांची संस्कृती यांना जोडण्याच्या या उपक्रमाचे कौतुक केले.
उद्घाटन समारंभाला साहित्य, कला, संस्कृती, राजकारण, उद्योग, समाजसेवा अशा सर्व क्षेत्रांतील अनेक नामवंत उपस्थित होते. शिवाय तीन दिवसांच्या महोत्सवात २00 खासदार हजर राहणार आहेत.
(लोकमत न्यूज नेटवर्क)
यमुना नदीचे पात्र आणि तट अशा तब्बल १,000 एकर जमिनीवर हा तीन दिवसांचा महोत्सव चालणार आहे. तो सुरू होण्यापूर्वी, अगदी शुक्रवारी सकाळपर्यंत अनेक वाद झाले. पण ते मिटले आणि कार्यक्रम झोकात सुरू झाला असून, त्यात जगभरातील १५५ देशांचे प्रतिनिधी सहभागी झाले आहेत.
आर्ट आॅफ लिव्हिंगच्या ३५ व्या वर्धापन दिनानिमित्त होणाऱ्या या महोत्सवात जगभरातील ३८ हजार कलाकार सहभागी झाले आहेत. या तीन दिवसांत ८५00 वादक ५0 प्रकारच्या वाद्यांतून वेगळीच सुरावट सादर करणार असून, त्यावर ३५00 कलाकार नृत्य सादर करतील. त्यासाठी उभारण्यात आलेला रंगमंचही अवाढव्य आहे. रंगमंचाची जागाच तब्बल सात एकरांची आहे.
>1 या महोत्सवासाठी संपूर्ण दिल्लीमध्ये कडक बंदोबस्त ठेवण्यात आला असून, १२ हजार पोलीस अधिकारी, कर्मचारी तसेच केंद्रीय व राज्य राखीव दलाचे जवान, सुरक्षा दलांचे जवान असा मोठाच फौजफाटा महोत्सवाच्या आसपास आहे. 2 दिल्लीतील ८0 हजार पोलीस या तीन दिवसांच्या काळात डोळ्यात तेल घालून सर्व सुरक्षेची तसेच कायदा व सुव्यवस्थेची काळजी घेणार आहेत. दिल्लीच्या काही भागांतून विमानांना बंदी घालण्यात आली आहे. 3 दिल्लीच्या जवळपास सर्वच भागांत सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. वाहतूक व्यवस्थेतही मोठे बदल करण्यात आल्याने तीन दिवसांत दिल्लीकरांना कामासाठी बाहेर पडताना त्रासही सहन करावा लागणार आहे.

Web Title: World cultural festival begins on the banks of river Yamuna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.