विश्वकप विजेत्यांचे कुस्तीपटूंना समर्थन, १९८३ चा क्रिकेट संघ पुन्हा मैदानात
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2023 06:09 AM2023-06-03T06:09:23+5:302023-06-03T06:10:12+5:30
पदकांचा विसर्जनाचा विचार चिंताजनक
नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटूंना पोलिसांनी ज्या पद्धतीने हाताळले ती अशोभनीय दृश्ये पाहून व्यथित झाल्याचे १९८३ च्या क्रिकेट विश्वविजेत्या क्रिकेटपटूंनी म्हटले आहे. यासंदर्भात एक प्रसिद्धिपत्रक जारी करून त्यांनी आंदोलक कुस्तीपटूंना पाठिंबा व्यक्त केला.
मेहनतीने मिळविलेली पदके कुस्तीपटू गंगा नदीत टाकण्याचा विचार करीत आहेत, याची आम्हाला चिंता आहे. त्या पदकांमध्ये अनेक वर्षांचे प्रयत्न, त्याग, दृढनिश्चय आणि धैर्य यांचा समावेश आहे. त्यात देशाचा अभिमान आणि आनंद आहे. आम्ही त्यांना कोणताही घाईघाईने निर्णय न घेण्याचे आवाहन करतो. देशातील कायदा विजयी ठरू द्या, असे तत्कालीन कर्णधार कपिल देव यांच्या नेतृत्वाखालील विश्वविजेत्या संघाने निवेदनात म्हटले आहे.
दरम्यान, कुस्तीपटूंना न्याय मिळावा, अशी प्रत्येकाची इच्छा आहे; परंतु हे सर्व कायदेशीर प्रक्रिया संपल्यानंतरच शक्य होईल, अशी भूमिका केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी शुक्रवारी मांडली.
खाप महापंचायतीचा आंदोलनाचा इशारा
खाप महापंचायतीने शुक्रवारी भारतीय कुस्ती महासंघाचे (डब्ल्यूएफआय) अध्यक्ष आणि भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांना ९ जूनपर्यंत अटक करण्याची मागणी केली. तसे न झाल्यास पुन्हा जंतर-मंतरवर आंदोलनाला बसण्याचा इशाराही दिला आहे. कथित लैंगिक छळाच्या प्रकरणाशी संबंधित आंदोलनात पुढील पावले उचलण्याबाबत चर्चा करण्यासाठी येथे बैठक झाली.
ब्रिजभूषणकडून अनेकदा विनयभंग झाल्याची तक्रार
दिल्ली पोलिसांनी ब्रिजभूषण यांच्या विरोधात दोन एफआयआर नोंदवले आहेत, त्यात प्रथम अल्पवयीन कुस्तीपटूच्या आरोपांच्या आधारे पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल आहे. ‘ब्रिजभूषण यांनी अनेकदा विनयभंग केला. श्वास तपासण्याच्या बहाण्याने टी-शर्टही काढायला लावला. ब्रिजभूषण यांनी शारीरिक संबंधाची मागणी केली होती. २०१९ मध्ये माझ्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला,’ असे अनेक आरोप अल्पवयीन कुस्तीपटूने केले आहेत.