जग महामंदीच्या उंबरठ्यावर; 26 अर्थव्यवस्थांवर कर्जाचा डोंगर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2018 11:18 AM2018-09-22T11:18:56+5:302018-09-22T11:19:54+5:30
अमेरिकेची सर्वांत जुनी बँक लेहमन ब्रदर्स बुडाली याला नुकतीच दहा वर्षे पूर्ण झाली. 2008 च्या महांदीतून सावरलेल्या अर्थव्यवस्था पुन्हा एकदा मंदीच्या उंबरठ्यावर आहेत.
नवी दिल्ली : अमेरिकेची सर्वांत जुनी बँक लेहमन ब्रदर्स बुडाली याला नुकतीच दहा वर्षे पूर्ण झाली. 2008 च्या महांदीतून सावरलेल्या अर्थव्यवस्था पुन्हा एकदा मंदीच्या उंबरठ्यावर आहेत. याबाबत साशंकत असली तरीही प्रगतीशिल देशआंवरील कर्जाचे आकडे पाहता अर्थतज्ञांनी तशी शक्यता वर्तविली आहे.
2008 मधील मंदीतून बाहेर पडण्यासाठी जगातील विविध केंद्रीय बँकांनी मोठ्या प्रमाणावर नोटा छापल्या. या नोटा बाजारातही आल्या. जवळपास 290 ट्रिलियन डॉलर एवढी भलीमोठी रक्कम (शेअर बाजार, बॉन्डस आणि इतर मालमत्तांमध्ये) बाजारात आलेली आहे. एवढी रक्कम आली तरीही या बँकांनी व्याजदर कमी ठेवले होते. तसेच गुंतवणूकदारांनी जास्त परतावा मिळण्यासाठी कमी दर्जाच्या गुंतवणूकांमध्ये पैसे टाकले. ही एक मोठी जोखीम आहे.
कर्जाचा डोंगर, तोही डॉलरमध्ये
वाढत्या अर्थव्यवस्थांना अमेरिकी डॉलरचा स्वीकार करावाच लागला. अमेरिकी डॉलर ही अघोषित रिझर्व्ह चलन बनले आहे. यामुळे जगभरातील सर्वच अर्थव्यवस्था अमेरिकेवर अवलंबून राहू लागल्या. वाढती आणि विकसनशिल अर्थव्यवस्थांमधून जादा फायदा मिळविण्यासाठी गुंतवणूकदारांनी कमी कमुदतीसाठी बराच पैसा ओतला. यामुळे या अर्थव्यवस्थांमध्ये कर्जाची रक्कम वाढत गेली. 2008 नंतर अशा अर्थव्यवस्थांवरील बाहेरच्या संस्थांचे कर्ज 40 ट्रिलियन डॉलरने वाढले. 2008 मध्ये 26 मोठ्या विकसनशिल अर्थव्यवस्थांचे कर्ज त्यांच्या विकास दराच्या 148 टक्के होते. जे 2017 मध्ये 211 टक्के झाले आहे.
कोलंबिया विद्यापीठाचे कायदेतज्ज्ञ कॅथरीन यांच्या नुसार 2008 च्या मंदीवेळी नियंत्रण प्रणालीमध्ये काही दोष होते. ही प्रणाली एकसंघ नव्हती, तर ती तुकड्या तुकड्यामध्ये होती. आजही त्यामध्ये काहीही बदल झालेला नाही. यामुळे हेच दोष पुन्हा जगाला महामंदीच्या दिशेने नेत आहेत.
चांगल्या गुंतवणुकीची कमतरता
जगभरात महागाईने डोके वर काढले आहे. मालमत्ता महागड्या असल्याने चांगल्या गुंतवणुकीचीही शक्यता धुसर आहे. म्हणजचे कमी संधी आहेत. यामुळे बाजारात सुधारणात्मक पाऊले उचलण्याची गरज आहे. या अर्थव्यवस्थांची अवस्था एवढी नाजूक आहे की एक छोटीशी घटनाही मोठा परिणाम करू शकते. आणि गेल्या वर्षभरात ब्रेक्झिट आणि अमेरिका-चीनमधले व्यापार युद्ध सुरु झाले आहे. यामुळे मंदी जगाचे दार पुन्हा ठोठावत असल्याचे चित्र आहे.