Coronavirus: भारतातील रुग्णांचा आकडा अमेरिका, चीनपेक्षा कमी, पण...; WHOच्या आकडेवारीनं चिंतेत भर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2020 01:14 PM2020-04-12T13:14:18+5:302020-04-12T13:42:07+5:30
भारतात आतापर्यंत एक लाख ७१ हजार जणांची कोरोनाची तपासणी झाली असून त्यापैकी ८,४५३ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.
नवी दिल्ली: संपूर्ण जगाला कोरोना व्हायरसने विळखा घातला आहे. चीनमधून पसरलेल्या कोरोनाने जगभरातील 200हून अधिक देशांमध्ये थैमान घातलं आहे. भारतातही गेल्या २४ तासांत १,०३५ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने देशातील एकूण बाधितांची संख्या ८ हजार ४५३ च्या घरात गेली आहे. तसेच कोरोनामुळे आतापर्यत देशात २९० लोकांचा मृत्यू झाला आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशभरात १४ एप्रिलपर्यत लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेतला. तसेच देशात १४ एप्रिलनंतर अजून दोन आठवडे लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला जाणार आहे, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. परंतु आता जागतिक आरोग्य संस्थेने एक अहवाल सादर केला आहे. या अहवालानूसार भारतात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी आहे. मात्र अमेरिका, चीन, जर्मनी या देशांपेक्षाही भारताचं कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूदराचं प्रमाण जास्त असल्याचा दावा करण्यात आला आहे. या दाव्याने देशभरात चिंतेचे वातवरण निर्माण झाले आहे.
WHOच्या अहवालानूसार, भारतात आतापर्यंत एक लाख ७१ हजार जणांची कोरोनाची तपासणी झाली असून त्यापैकी ८,४५३ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. आतापर्यंत भारतात कोरोनामुळे २९० जणांचा मृत्यू झाला आहे. परंतु अमेरिकेत जेव्हा ७९८७ जणांना करोनाची लागण झाली होती तेव्हा १०० जणांचा मृत्यू झाला होता. त्याचप्रमाणे कोरोनाचा केंद्रबिंदू असलेल्या चीनमध्ये पहिल्या ७७३६ कोरोना रूग्णांपैकी १७० जणांचा मृत्यू झाला होता.
भारतात ८४५३ कोरोना रूग्णांपैकी २९० जणांचा मृत्यू झाला आहे. याच आधारावर भाराताचा मृत्यूदर ३.२१ टक्के इतका आहे. दुसरीकडे अमेरिकेत ज्यावेळी ७०८७ जणांना कोरोनाची लागण झाली तेव्हा १०० जणांचा मृत्यू झाला होता. त्यानुसार अमेरिकेचा मृत्यूदर १.४१ टक्के असा होतो. तसेच चीनमध्ये देखील जेव्हा ७००० हजार रुग्णांना कोरोनाची लागण झाली होती तेव्हा चीनचा या आकड्यांनूसार मृत्यूदर २.२ टक्के असा होता. जर्मनीमध्ये ज्यावेळी ७१५६ कोरोनाचे रूग्ण झाले तेव्हा फक्त १३ जणांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे जर्मनीचा मृत्यूदर ०.१८ टक्के होता.
दरम्यान, जगातील २११ देशांमध्ये आतापर्यंत १७ लाख, ३५ हजार रुग्ण आढळून आले, त्यापैकी १२ लाख, ३० हजार जणांवर सध्या उपचार सुरू असून त्यापैकी ५० हजार जणांची प्रकृती चिंताजनक आहे. मात्र, सुमारे ४ लाख रुग्ण या आजारातून बचावलेही आहेत. अमेरिकेमध्ये रुग्णांची संख्या ५ लाख, ३ हजारांवर गेली आहे. अमेरिकेखालोखाल इटलीमध्ये १८ हजार, ९०० जण कोरोनामुळे मरण पावले आहेत आणि स्पेनमध्ये मृतांचा आकडा १६ हजार, ५०० वर गेला आहे. फ्रान्समध्ये कोरोनाने १३ हजार, २०० जणांचा तर ब्रिटनमध्ये ९ हजारांहून अधिक रुग्णांची बळी घेतला आहे.