पंजाबमधल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर जागतिक कबड्डी स्पर्धा रद्द
By admin | Published: October 20, 2015 03:27 PM2015-10-20T15:27:16+5:302015-10-20T15:32:53+5:30
शिखांच्या पवित्र धर्मग्रंथाचा गुरुग्रंथसाहिबची विटंबना झाल्याच्या पार्श्वभूमीवर पंजाबचे उपमुख्यमंत्री सुखबीर बादल यांनी सहावी जागतिक कबड्डी स्पर्धा रद्द केल्याचे जाहीर केले.
Next
>ऑनलाइन लोकमत
चंडीगड, दि. २० - शिखांच्या पवित्र धर्मग्रंथाचा गुरुग्रंथसाहिबची विटंबना झालेली असताना जागतिक क्रीडा स्पर्धा पंजाबात भरवणे योग्य होणार नाही असे सांगत पंजाबचे उपमुख्यमंत्री सुखबीर बादल यांनी सहावी जागतिक कबड्डी स्पर्धा रद्द केल्याचे जाहीर केले आहे.
पंजाबमध्ये गुरुग्रंथसाहिबची विटंबना केल्याप्रकरणी उग्र निदर्शने करण्यात येत असून अनेक ठिकाणी तर सैन्याच्या तुकड्यांना पाचारण करावे लागले आहे. बादल हेच क्रीडामंत्री असून ज्यावेळी हजारो शीख शोकमग्न असताना क्रीडा स्पर्धा भरवणे अनुचित असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
लुधियाना, अमृतसर, जालंधर अशा अनेक शहरांमध्ये हजारो शीख रस्त्यावर उतरल्याने तणावाचे वातावरण असून निमलष्करी दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. पोलीस व निदर्शकांमध्ये चकमकी घडल्याच्या घटना घडल्या असून अनेक ठिकाणी बंदचे वातावरण आहे. पोलीसांनी सोमवारी गुरुग्रंथसाहिबच्या विटंबनेप्रकरणी दोनजणांना अटक केली आहे. अमृतसर जिल्ह्याचे शीख गुरू ग्रंथी जगदीप सिंग आणि लुधियानातील महिला बलविंदर कौर अशी अटक केलेल्यांची नावं आहेत. या दोघांनी पवित्र ग्रंथाची विटंबना केल्याचे मान्य केले, परंतु असे करण्यामागचा त्यांचा हेतू अद्याप समजला नसल्याचे पोलीसांनी सांगितले.