World No Tobacco Day : परिस्थिती गंभीर! देशात तंबाखू आणि धूम्रपानामुळे दरवर्षी 13 लाख लोकांचा मृत्यू; कोरोनाचाही सर्वाधिक धोका

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2021 02:21 PM2021-05-31T14:21:29+5:302021-05-31T14:29:21+5:30

World No Tobacco Day : गेल्या वर्षभरात देशात धूम्रपान आणि तंबाखू खाणाऱ्यांच्या संख्येतही थोडीशी घट झालेली पाहायला मिळत आहे. मात्र तरीदेखील परिस्थिती गंभीर असल्याचं चित्र आहे.

World No Tobacco Day union health minister says 3500 deaths due to tobacco and smoking in india per day | World No Tobacco Day : परिस्थिती गंभीर! देशात तंबाखू आणि धूम्रपानामुळे दरवर्षी 13 लाख लोकांचा मृत्यू; कोरोनाचाही सर्वाधिक धोका

World No Tobacco Day : परिस्थिती गंभीर! देशात तंबाखू आणि धूम्रपानामुळे दरवर्षी 13 लाख लोकांचा मृत्यू; कोरोनाचाही सर्वाधिक धोका

googlenewsNext

नवी दिल्ली - देश कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी सज्ज झाला आहे. काही दिवसांपूर्वी देशामध्ये कोरोनाचा धोका वाढला असून रुग्णांची संख्यादेखील वाढत होती. मात्र आता सध्या देशात कोरोनाचा वेग मंदावताना दिसत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल दोन कोटींचा टप्पा पार केला आहे. तर दुसरीकडे गेल्या वर्षभरात देशात धूम्रपान आणि तंबाखू खाणाऱ्यांच्या संख्येतही थोडीशी घट झालेली पाहायला मिळत आहे. मात्र तरीदेखील परिस्थिती गंभीर असल्याचं चित्र आहे. कारण दररोज तंबाखू आणि धूम्रपान याच्यामुळे 3500 लोकांना आपला जीव गमवावा लागत आहे. 

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी सोमवारी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली आहे. भारतात दरवर्षी तंबाखू सेवन आणि धूम्रपानामुळे 13 लाख जणांचा मृत्यू होतो. म्हणजेच दिवसाला 3500 लोकांचा मृत्यू होत आहे. मात्र गेल्या वर्षभरात देशातील धूम्रपान आणि तंबाखू सेवनाचे प्रमाण सहा टक्क्यांनी कमी झाले आहे. यापूर्वी हे प्रमाण 34.6 टक्के होते ते आता 28.6 टक्के इतके झाल्याची माहिती मिळत आहे. तंबाखूचे सेवन करणाऱ्यांना आणि धूम्रपानाची सवय असलेल्या लोकांना कोरोनामुळे मृत्यू होण्याचा धोका 40 ते 50 टक्के अधिक असतो. या व्यसनांमुळे फक्त फुफ्फुसे, हृदय आणि कर्करोगच होत नाही तर शरीरातील इतर अवयवांवरही परिणाम होतो असं डॉ. हर्षवर्धन यांनी म्हटलं आहे.

कोरोनाचाही सर्वाधिक धोका

कोरोना संकटाने गंभीर रूप धारण केले आहे. धूम्रपान करणाऱ्या व्यक्तीस कोरोनाचा संसर्ग झाल्यास त्याची तीव्रता वाढते. शिवाय, सातत्याने धूम्रपान करणाऱ्या चारजणांपैकी किमान एकाला ‘सीओपीडी’ (क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मनरी डिसीज) होण्याचा अधिक धोका असतो. धूम्रपान करणाऱ्यांपैकी 40 टक्के जणांना गंभीर स्वरुपाचा दमा होतो आणि त्यातील अर्धेअधिक लोकांना ‘सीओपीडी’ही होत असल्याचे श्वसन रोग तज्ज्ञांचे म्हणणे आहे. धूम्रपानामुळे फुफ्फुसे, घसा किंवा कर्करोगाने मृत्यूचा धोका 14 पटीने वाढतो. अन्ननलिकेच्या कर्करोगाने मृत्यूचा धोका चारपटीने वाढतो. हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू होण्याचा धोका दुप्पट, तर मूत्राशयाच्या कर्करोगाने मृत्यू होण्याचा धोकाही दुप्पटीने वाढतो.

‘सीओपीडी’, हृदय व हृदयरक्तवाहिनीसंबंधीतील आजार (कार्डिओव्हस्क्युलर डिसीज) आणि फुफ्फुसांचा कर्करोग यासाठी धूम्रपान हा एक प्रमुख घटक आहे. परंतु, धूम्रपान सोडल्यास फुफ्फुसांचा कर्करोग होण्याचा धोका 50 टक्क्यांनी कमी होतो. धूम्रपानाची सवय मोडणे कठीण असले तरी ते शक्य आहे. तंबाखूतील रासायनिक उत्तेजित घटक ‘निकोटीन’ हा व्यसन लावणारा घटक आहे. यामुळे याची तीव्र इच्छा होत राहते; परंतु सुदैवाने ही तीव्र इच्छा आणि निकोटीन सोडल्यानंतर दिसणारी लक्षणे यांच्यावर नियंत्रण मिळविण्यास मदत करणारे वैद्यकीय उपचार उपलब्ध  असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

Web Title: World No Tobacco Day union health minister says 3500 deaths due to tobacco and smoking in india per day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.