भारतात इसिससाठी भरती करणारा अमेरिकेकडून जागतिक दहशतवादी घोषित
By admin | Published: June 16, 2017 10:05 AM2017-06-16T10:05:06+5:302017-06-16T11:18:15+5:30
भारतामध्ये इसिससाठी भरती करणाऱ्या मोहम्मद शफी अरमारला अमेरिकेने जागतिक दहशतवादी घोषित केलं आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 16- भारतामध्ये इसिससाठी भरती करणाऱ्या मोहम्मद शफी अरमारला अमेरिकेने जागतिक दहशतवादी घोषित केलं आहे. युसुफ-अल हिंदी या नावाने मोहम्मद सोशल साइट्सवर वावरत होता. भारतातमध्ये गेल्या तीन वर्षात मोहम्मदने इसिसचे गट तयार केल्याचा आरोप अमेरिकेने केला आहे. जुनूद-अल खलिफा-ए-हिंद हा गटसुद्धा मोहम्मदने स्थापित केला असून त्यामध्ये 50 भारतीय मुलांना त्याने सहभागी करून घेतलं आहे. द टाइम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्राने ही बातमी दिली आहे. अमेरिकेच्या स्टेट डिपार्टमेंटने मोहम्मद शफी अरमार, ओसामा अहमद अतार आणि मोहम्मद ईसा युसूफ साकर अल बिनाली या तिघांनाही जागतिक दहशतवाद्यांच्या यादीत टाकलं आहे तसंच त्यांच्यावर प्रतिबंध लावले जाणार आहे.
शफी हा भारतातमध्ये इसिस संघटना स्थापन करण्यासाठी जबाबदार आहे. तसंच इसिसचा म्होरक्या अबू बकर अल-बगदादी आणि त्याच्या निकटवर्तियांपैकी शफी एक आहे. अमेरिकेच्या या घोषणेमुळे फक्त इसिसच्या भारतातातील प्रमुखाची ओळखच नाही झाली तर त्याच्या सीरियामध्ये त्यांच्या मृत्यूविषयी जी अफवा होती तीसुद्धा स्पष्ट झाली आहे.
मोहम्मद शफी अरमारचं नाव 2011मध्ये दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या रडारवर पहिल्यांदा आलं होतं. त्यावेळी शफी अरमार आणि त्याचा भाऊ सुल्तान इंडियन मुजाहिदीनमध्ये होते आणि ते पाकिस्तानात राहत होते. पोलिसांच्या स्पेशल सेलने 2011मध्ये दरभंगामधून इंडियन मुजाहिदीनचे काही दहशतवादी पकडले होते. या कारवाईत मोहम्मद कतील सिद्दीकीला सगळ्यात पहिल्यांदा अटक झाली होती. त्याची 2012मध्ये पुण्याच्या येरवडा जेलमध्ये हत्या करण्यात आली. यानंतर स्पेशल सेलने 54/2011 अंतर्गत एफआयआऱ दाखल केली होती. स्पेशल सेलच्या कारवाईत अटक केलेल्या या दहशतवाद्यांकडूनच पोलिसांना मोहम्मद शफी अरमारबद्दल माहिती मिळाली होती. त्यावेळी शफी सोशल मीडियावर तरूणांचं ब्रेनवॉश करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. शफी अरमार त्यावेळी दहशतवाद्यांचा मोठा चेहरा होता.
एनआयएने गेल्यावर्षी केलेल्या कारवाईत जुनूद-अल खलिफा-ए-हिंदमध्ये भरती झालेल्या 23 जणांना अटक केली होती. शफी अरमारला ग्लोबर टेररिस्ट घोषित करावं अशी मागणी भारताने युनायटेड स्टेट्स आणि युनायटेड नेशन्सकडे केली होती. शफी अरमर फेसबुक आणि इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून 600 ते 700 भारतीय तरूणांच्या संपर्कात होता, असा संशय व्यक्त केला जातो आहे. भारतातील इसिसच्या संघटनेसाठी त्याने हवालामार्फत पैसा जमवला होता असंही बोललं जातं आहे.