दिल्लीच्या एनएसडीमध्ये अवतरणार जागतिक रंगभूमी
By admin | Published: October 15, 2016 01:48 AM2016-10-15T01:48:10+5:302016-10-15T01:48:10+5:30
दिल्लीतल्या नॅशनल स्कूल आॅफ ड्रामा (एनएसडी) मध्ये १९ ते २५ आॅक्टोबर या काळात जागतिक रंगभूमी अवतरणार आहे. एनएसडीत नवव्या आशिया
सुरेश भटेवरा / नवी दिल्ली
दिल्लीतल्या नॅशनल स्कूल आॅफ ड्रामा (एनएसडी) मध्ये १९ ते २५ आॅक्टोबर या काळात जागतिक रंगभूमी अवतरणार आहे. एनएसडीत नवव्या आशिया पॅसिफिक मीटचे आयोजन करण्यात आले असून, एनएसडीसाठी हा महत्त्वाचा टप्पा आहे.
भारतीय रंगभूमीसह चीन, बांगला देश, इंडोनेशिया, इराण, इराक, जपान, द. कोरिया, मलेशिया, फिलिपाइन्स, सिंगापूर व थायलंड या १0 देशांतील १४ थिएटर स्कूलचे रंगकर्मी आपल्या नाट्य कलाकृती, संस्कृती व कला क्षेत्रातील अनुभव यांचे आदान प्रदान करतील, अशी माहिती एनएसडीचे संचालक प्रा. वामन केंद्रेंनी दिली.
प्रा. केंद्रे म्हणाले, ‘द स्ट्रेंग्थ आॅफ आशिया इन कंटेंपररी थिएटर परफॉर्मन्स कल्चर’ ही नवव्या आशिया पॅसिफिक मीटची थिम आहे. त्याला अनुसरून १0 थिएटर स्कूलशी संलग्न २0 देशातले नाट्य कला शिक्षक, विद्यार्थी, समीक्षक व रंगभूमी कलाकार या संमेलनात सहभागी होत आहेत. या निमित्ताने भारतीय रंगभूमीचे कलाकार आपल्या थिएटर कलेचा व रंगभूमीच्या महान परंपरेचा अविष्कार जगासमोर सादर करतील. भारतातल्या रंगकर्मींना आशिया पॅसिफिक ब्युरो स्कुल थिएटरच्या विविध कलाकृतींचा आस्वाद घेण्याची संधीही मिळेल.
पाश्चात्य रंगभूमी आणि आशिया पॅसिफिक रंगभूमीच्या नाट्य अविष्कारात बराच फरक आहे, असे नमूद करीत केंद्रे म्हणाले, या निमित्ताने जागतिक रंगभूमीच्या नाट्य चळवळीतल्या नव्या प्रवाहांचे, नाट्य संहितेतल्या नव्या संकल्पनांचे अवलोकन रंगकर्मीना करता येईल. नवव्या आशिया पॅसिफिक मीट च्या संयोजन समितीच्या सूत्रधार प्रा. त्रिपुरारी शर्मा आहेत. त्या म्हणाल्या, १0 देशातील १४ थिएटर स्कूलच्या रंगकर्र्मींनी परस्परांना भेटावे, नाट्यकलेतील बारकाव्यांबाबत इतरांना माहिती देत त्याची चर्चा घडावी, हा संमेलनाचा हेतू आहे.