अर्जेंटिनातील विश्व योग स्पर्धेत नेहर्नचा ‘सुवर्ण चौकार’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2018 11:11 PM2018-05-08T23:11:23+5:302018-05-08T23:21:14+5:30
आर्टिस्टिक योगा हा नेहर्नचा कसलेला विषय आहे. यातील त्याचे सादरणीकरणातील कौशल्य अनेकांना प्रभावित करते.
पणजी : अर्जेंटिना येथे झालेल्या २६व्या विश्व योगा चॅम्पियनशीपमध्ये गोव्याच्या मास्टर नेहर्न आचार्य याने चार सुवर्णपदकांची कमाई केली. अत्यंत लवचिक आणि तितकाच तीक्ष्ण असलेल्या नेहर्न याने स्पर्धेत अनेकांची मने जिंकली. त्याच्या सादरीकरणालाही उत्कृष्ट दाद मिळाली. ६ ते ८ मे दरम्यान ही स्पर्धा झाली.
नेहर्न हा आंतरराष्ट्रीय योगपटू असून तो लिटील पेन्ग्वीन, हेडगेवार हायस्कूल, पीपल्स हायस्कूल आणि धेंपे उच्च माध्यमिक विद्यालयाचा माजी विद्यार्थी आहे. त्याने स्पर्धेत योगासन, आर्टिस्टिक योगा डिस्प्ले या प्रकारात भाग घेतला होता. नेहर्नने राष्ट्रीय, फेडरेशन चषक, आशियाई चॅम्पियनशीप, आंतरराष्ट्रीय चॅम्पियनशीप तसेच उरूग्वे, इटली, अर्जेंटिना, रशिया, थायलंड आणि मलेशिया येथे झालेल्या विश्व चॅम्पियनशीपमध्येही भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. आर्टिस्टिक योगा हा नेहर्नचा कसलेला विषय आहे. यातील त्याचे सादरणीकरणातील कौशल्य अनेकांना प्रभावित करते.
उल्लेखनीय म्हणजे, यापूर्वीही विश्व योगा स्पर्धेत नेहर्नने त्याने ४ सुवर्ण मिळवले होते. याच इतिहासाची त्याने पुनरावृत्ती केली. २००७ ते २०१७ दरम्यान नेहर्न याने राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर पदके मिळवली आहेत. सध्या तो एनआयटीटीई येथे फिजिओ आणि योगाचा अभ्यास करीत आहे. त्याने विद्यापीठातर्फे २८ सुवर्ण, ५ रौप्य आणि ५ कांस्य पदके पटकाविली आहेत. त्याला योगा फेडरेशन ऑफ इंडियाचे अशोक कुमार अग्रवाल यांचे पूर्ण सहकार्य मिळत असून ते त्याच्या कौशल्यावर प्रभावित आहेत. मंगलोर येथील वेणू गोपाल आचार्य हे नेहर्नचे कोरियोग्राफर असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली तो आपल्या सादरीकरणाने छाप सोडत आहे.
दरम्यान, आतापर्यंत ३२ सुवर्ण, ५ रौप्य आणि ५ कांस्य पदकांची कमाई करणाऱ्या नेहर्नच्या यशात योगा असोसिएशन आणि गोवा क्रीडा प्राधिकरणाचा महत्त्वाचा वाटा आहे. नेहर्नने या दोघांचेही आभार व्यक्त केले. तसेच आतापर्यंत सहकार्य आणि मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षक, आई-वडिलांचाही तो आभारी आहे. त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या.
अपेक्षेनुसार यश : नविन आचार्य
आर्टिस्टिक हा योगप्रकार अर्जेंटिनातूनच सुरू झाला आहे. त्यामुळे अर्जेंटिनाच्या योगपटूंना नमवून सुवर्ण मिळवणे, खूप अभिमानास्पद अशी बाब आहे. गेल्या तीन महिन्यांपासून नेहर्न मेहनत करत आहे. त्याच्याकडून मला चार पदकांची आशा होती. त्याने ती पूर्ण केली. यापेक्षा मोठी समाधानाची बाब होऊ शकत नाही. मला आनंद वाटतोय, असे नेहर्नच्या वडिलांनी सांगितले.