गुजरातेत विश्वविक्रमी ‘योग’!

By Admin | Published: June 22, 2016 03:00 AM2016-06-22T03:00:15+5:302016-06-22T03:00:15+5:30

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मंगळवारी गुजरातच्या राजकोटमध्ये सुमारे १६०० गर्भवती महिलांनी योगासने करून नवा विश्वविक्रम स्थापित केला.

World 'Yoga' in Gujrat! | गुजरातेत विश्वविक्रमी ‘योग’!

गुजरातेत विश्वविक्रमी ‘योग’!

googlenewsNext

अहमदाबाद : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मंगळवारी गुजरातच्या राजकोटमध्ये सुमारे १६०० गर्भवती महिलांनी योगासने करून नवा विश्वविक्रम स्थापित केला. तर राज्यभरात ४०,००० ठिकाणी आयोजित कार्यक्रमांमध्ये सव्वा कोटी लोकांनी सहभाग घेतला.
मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल म्हणाल्या, १६०० गर्भवती महिलांच्या विश्वविक्रमासोबतच ८,००० मुलांनी राजकोटमधील पटांगणावर मानवी शृंखला तयार करून आणखी एक जागतिक विक्रम केला आहे. राजकोटचे जिल्हाधिकारी विक्रांत पांडे यांच्या सांगण्यानुसार या कार्यक्रमात १६०० गर्भवती महिला सहभागी झाल्या होत्या.
यापूर्वी चीनने केलेला विक्रम मोडला असल्याचा दावा त्यांनी केला. चीनमध्ये ९१३ गर्भवती महिलांनी योगासने करून विक्रम स्थापित केला होता. या कार्यक्रमाचे चित्रीकरण करण्यात आले असून गिनिज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डच्या ज्युरींना ते पाठविण्यात येणार आहे. या दरम्यान आपत्कालीन स्थितीचा सामना करण्याकरिता १८ स्त्री रोगतज्ज्ञ, डॉक्टरांचे पथक व १०८ रुग्णवाहिका सज्ज होत्या. (वृत्तसंस्था)


योग ही भारताची देणगी - बान की मून
संयुक्त राष्ट्र : सद्भावनेला चालना देणे हा योगाचा संदेश आहे, असे सांगतानाच वर्णभेद, लिंगभेद याच्याबाहेर जाऊन एकतेचा संकल्प करा, असे आवाहन संयुक्त राष्ट्राचे महासचिव बान की मून यांनी केले. आरोग्यपूर्व जीवनशैलीचा अवलंब करा, एकतेचा संकल्प करा. वर्णभेद आणि लिंगभेद बाजूला सारून समानतेचे आवाहन त्यांनी केले. बान की मून यांचे विशेष सल्लागार विजय नाम्बियार यांनी हा संदेश वाचून दाखविला. ते म्हणाले आहे की, योग ही प्राचीन शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक क्रिया भारताची देणगी असून, आता संपूर्ण जगात त्याचा अंगीकार केला जात आहे.

नवी दिल्लीत सशस्त्र दलाची सागरी योगासने
सशस्त्र दलांनी दुसऱ्या आंतरराष्ट्रीय योगदिनी देशभरात विविध ठिकाणांसह समुद्रात युद्धनौकांवर योगासने करून आपला सहभाग नोंदविला.
नौदल आणि सागरी सीमा सुरक्षा दलातर्फे (कोस्टल गार्ड) आयएनएस ऐरावत, विराट आणि आयसीजीएस सागरवर योगभ्यासाचे आयोजन करण्यात आले होते.
याशिवाय अंदमान निकोबार बेटांसारख्या पर्वतीय भागातही सेनेने योगदिन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. लष्कर प्रमुख जनरल दलबीरसिंग सुहाग, वायुदल प्रमुख अरूप राहा आणि कोस्टल गार्डचे महासंचालक राजेंद्रसिंग हे सुद्धा योगाभ्यासात सहभागी झाले होते.

चंदीगडमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांची निदर्शने
राज्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी योग दिन समारंभाविरोधात निदर्शने दिली. या कार्यक्रमाला मोदी उपस्थित होते. आम्ही योगाविरुद्ध नाही तर मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांविरुद्ध आंदोलन करीत होतो, असे कार्यकर्त्यांचे म्हणणे होते.

संस्कृत श्लोकाला केरळमध्ये आक्षेप
तिरुअनंतपुरम : केरळच्या आरोग्य मंत्री आणि माकपाच्या ज्येष्ठ नेत्या के.के. शैलजा यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शासकीय समारंभात संस्कृत श्लोक समाविष्ट करण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करून नव्या वादाला तोंड फोडले.
सेंट्रल स्टेडियममध्ये आयोजित राज्यस्तरीय योग दिन कार्यक्रमात त्या सहभागी झाल्या होत्या. त्यांनी अधिकाऱ्यांना श्लोक म्हणणे आवश्यक होते काय? असा प्रश्न केला.
भारत हा एक धर्मनिरपेक्ष देश आहे. योगाभ्यास सुरू करण्यापूर्वी प्रत्येक धार्मिक समुदायाचे लोक आपली प्रार्थना म्हणू शकतात. कुठल्याही धर्मावर विश्वास नसलेल्या लोकांचीही एकाग्रतेची आपली पद्धत असते, असे शैलजा यांचे म्हणणे होते. त्यांच्या या वक्तव्यावर भाजपाने टीका केली.

Web Title: World 'Yoga' in Gujrat!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.