भारतातील नागरिकांपेक्षा पाकिस्तानातील लोक जास्त आनंदी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2018 11:00 AM2018-03-15T11:00:59+5:302018-03-15T11:00:59+5:30
पाकिस्तानामधील लोक हे भारतातील लोकांपेक्षा जास्त आनंदी व सुखी असल्याचं समोर आलं आहे.
रोम- पाकिस्तानने भारताला एका गोष्टीत मागे टाकलं आहे. पाकिस्तानामधील लोक हे भारतातील लोकांपेक्षा जास्त आनंदी व सुखी असल्याचं समोर आलं आहे. संयुक्त राष्ट्राने केलेल्या सर्व्हेत ही गोष्ट समोर आली आहे. संयुक्त राष्ट्र दरवर्षी आनंदी देशांची यादी तयार करतं. या यादीत पाकिस्तानने भारताला मागे टाकलं आहे. 156 देशांच्या यादीत भारत 133 व्या क्रमांकावर आहे.
2017 मधील वर्ल्ड हॅप्पीनेस रिपोर्टमध्ये भारताची चार क्रमांकाने घसरण झाली होती. 2018 मधील रिपोर्टमध्ये भारत 11 क्रमांकांनी खाली आला आहे. 2017 च्या आकेवारी प्रमाणेच 2018 मध्येही पाकिस्तानने भारतात आनंदी असण्याच्या यादीत मागे टाकलं आहे. या यादीत पाकिस्तान 75 व्या क्रमांकावर आहे.
पाकिस्तानबरोबरच इतर शेजरा देशही भारतापेक्षा जास्त सुखी असल्याचं या यादीत म्हंटलं आहे. आनंदी देशांच्या क्रमवारीत बांगलादेश, भुतान, नेपाळ आणि श्रीलंकादेखील भारताच्या पुढे आहेत. बुधवारी हा वर्ल्ड हॅप्पीनेस रिपोर्ट प्रसिद्ध झाला असून या यादीत फिनलँड पहिल्या क्रमांकावर आहे. सामाजिक पाठिंबा, भ्रष्टाचारसारखे मुद्दे लक्षात घेऊन सोबतच लोकांच्या अपेक्षा यावरुन हा रिपोर्ट तयार करण्यात आला आहे.
हे आहेत टॉप 10 देश
या यादीत फिनलँड पहिल्या क्रमांकावर आहे, यानंतर नॉर्वे, डेनमार्क, आइसलँड, स्वित्झलँड, नेदरलँड, कॅनडा, न्यूझिलंड, स्वीडन आणि ऑस्ट्रेलिया या देशांचा नंबर लागतो.
टॉप 15मध्ये अमेरिका नाही
अमेरिकेची या यादीत घसरण झाली आहे. गेल्या वर्षी यादीत अमेरिका 14 व्या स्थानी होता. यावर्षीच्या यादीत अमेरिका 18 व्या स्थानी आहे.