खळबळजनक! जगातील सर्वाधिक उंचीवरील तुंगनाथाचे शिव मंदिर झुकले, शास्त्रज्ञही टेन्शनमध्ये
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2023 12:26 PM2023-05-17T12:26:23+5:302023-05-17T12:26:49+5:30
मंदिराच्या जमिनीचा खालचा भाग घसरण्याची किंवा कोसळण्याची शक्यता आहे, असा अंदाज एएसआयने लावला आहे.
डेहराडून : उत्तराखंडच्या रुद्रप्रयागहून धक्कादायक बातमी येत आहे. जगातील सर्वांत उंचीवर असलेल्या शंकराचे मंदिर तुंगनाथ शिव मंदिर झुकू लागले आहे. आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाने केलेल्या निरीक्षणात ही बाब समोर आली आहे. यामुळे एएसआयचे तज्ञही हैराण झाले आहेत.
मंदिरात ५ ते ६ डिग्री आणि परिसरातील व आत असलेल्या मूर्ती आणि छोट्या छोट्या संरचना १० अंशांपर्यंत झुकल्या आहेत. केंद्र सरकारला यासंदर्भात माहिती देण्यात आली असून संरक्षित इमारत म्हणून जाहीर करण्याची मागणी तज्ञांनी केली आहे. यावर सरकारनेही पुढचे पाऊल टाकण्यास सुरुवात केली आहे. मंदिर झुकण्याचे मुख्य कारण शोधून ते दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
जोशीमठाच्या प्रकारामुळे यंत्रणा सावध झाली आहे. एएसआयच्या डेहराडून सर्कलचे अधीक्षक पुरातत्वशास्त्रज्ञ मनोज कुमार सक्सेना यांनी सांगितले की, सर्वप्रथम आम्ही तुंगनाथ मंदिर झुकण्याचे आणि नुकसानीचे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न करू. त्यानंतर शक्य झाल्यास दुरुस्ती देखील केली जाईल. मंदिर परिसराची पाहणी करून सविस्तर रुपरेषा तयार करण्यात येणार आहे.
मंदिराच्या जमिनीचा खालचा भाग घसरण्याची किंवा कोसळण्याची शक्यता आहे. तज्ञांच्या सल्ल्याने पायाभरणी मजबूत करण्यात येईल. हा झुकलेला कोण मोजण्यासाठी एएसआयने काचेचे स्केल बसविले आहे. यानुसार ठराविक काळात सातत्याने मोजणी केली जाणार आहे.