जगातील सर्वात मोठा चेनाब रेल्वे ब्रीज महिनाभरात पूर्ण होणार; भारत इतिहास रचणार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2022 04:29 PM2022-08-05T16:29:54+5:302022-08-05T16:30:08+5:30
उत्तर रेल्वे (NR) आणि कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (KRCL) या दोघांनी प्रतिष्ठित चेनाब ब्रीजच्या डिझाइनला अंतिम रूप देण्यात मोठी भूमिका बजावली होती.
रियासी - जम्मू आणि काश्मीरमधील जगातील सर्वात उंच चेनाब रेल्वे ब्रीज हा भारताच्या पायाभूत सुविधा क्षेत्रातील एक मैलाचा दगड ठरणार आहे. या महिन्यात ब्रिजचे अभियांत्रिकी काम पूर्णत्वाच्या दिशेने जाणार आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर तो ब्रिज पॅरिस मधील आयफेल टॉवर (Eiffel Tower) पेक्षा ३५ मीटर उंच असेल. रियासी जिल्ह्यातील कौरी गावाजवळ सलाल धरणाच्या वरच्या बाजूला ह्या ब्रिजचे काम सुरु आहे. हा ब्रिज मुंबईस्थित पायाभूत सुविधा क्षेत्रातील प्रमुख अॅफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड द्वारे बांधला जात आहे.
चेनाब नदीपात्रापासून ३५९ मीटर उंची वरील ब्रिजचे ओव्हरआर्च डेक लॉन्चिंग गोल्डन जॉइंट (golden joint) सह पूर्ण होईल. गेल्या वर्षी जगातील सर्वात उंच अशा ह्या रेल्वे ब्रिजच्या स्टील आर्चचे काम पूर्ण झाले. हा ब्रिज जम्मू उधमपूर बारामुल्ला रेल्वे लिंक प्रकल्पाचा भाग आहे. या प्रकल्पामुळे जम्मू काश्मीर मधील दुर्गम भाग देशाच्या इतर भागाशी जोडले जातील. १३१५ मीटर लांबीच्या चेनाब रेल्वे ब्रीजच्या बांधकामात सुमारे ३०३५० मेट्रिक टन स्टीलचा वापर करण्यात आला आहे. तर आर्चच्या बांधकामात १०६२० MT स्टीलचा वापर झाला आहे आणि १४५०४ MT स्टीलचा वापर ब्रीजच्या डेकच्या बांधकामात झाला आहे.
चेनाब ब्रिजमध्ये ९३ डेक सेगमेंट (deck segment), ज्याचे प्रत्येकी वजन सुमारे ८५ टन आहे, एकाच वेळी दरीच्या दोन्ही टोकांवरून शक्तिशाली स्टील आर्चवर बसविले गेले आणि पाच प्रगतीपथावर आहेत. ओव्हरआर्च डेकच्या दोन्ही बाजू मिळतील त्यास गोल्डन जॉइंट म्हणतात. ते झाल्यानंतर चेनाब नदीवरील हा पूल पूर्ण होईल आणि जम्मू-काश्मीरच्या इतिहासात एक नवीन अध्याय सुरू होईल.
"चेनाब नदीपात्रापासून 359 मीटर उंचीवरील ओव्हरआर्क डेक पूर्ण करणे ही एक विलक्षण कामगिरी असेल. या अभियांत्रिकी यशात योगदान देणाऱ्या प्रत्येक अभियंता आणि कामगारांबद्दल माझ्या मनात उच्च आदर आहे. हा गोल्डन जॉइंट भारतीय रेल्वेच्या इतिहासात सुवर्णपर्वाची सुरुवात करेल आणि जम्मू-काश्मीरच्या इतिहासातील एक सुवर्ण अध्याय बनेल. बांधकाम अभियांत्रिकी पूर्णपणे भारतीय अभियंत्यांनी केले आहे. ज्यामुळे चेनाब रेल्वे ब्रीज हे आत्मनिर्भर भारताचे प्रतीक बनतो असे अॅफकॉन्सचे उप व्यवस्थापकीय संचालक गिरीधर राजगोपालन म्हणाले.
उत्तर रेल्वे (NR) आणि कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (KRCL) या दोघांनी प्रतिष्ठित चेनाब ब्रीजच्या डिझाइनला अंतिम रूप देण्यात मोठी भूमिका बजावली होती. पूल बांधणीच्या महत्त्वाच्या टप्प्यांवर त्यांच्या सहभागावर बोलताना गिरीधर म्हणाले, “आम्हाला कोणत्याही तांत्रिक समस्येसाठी प्रचंड पाठिंबा मिळाला, मेथड स्टेटमेंट आणि रेखाचित्रांसाठी मान्यता, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे उत्तर रेल्वे आणि कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड या दोघांनी स्थानिक रोजगार निर्माण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने प्रकल्पाच्या ठिकाणी जाण्यासाठी सर्व रस्ते बांधले. या रस्त्यांमुळे या भागातील दूरवरच्या गावांना जोडणी मिळाली आहे. उत्तर रेल्वेने आम्हाला वेल्ड्सच्या तपासणीसाठी फेज्ड अॅरे अल्ट्रासोनिक टेस्टिंग मशीन (Phased Array Untrasonic Testing Machine) वापरण्याची परवानगी दिली. भारतात प्रथमच असे करण्यात आले आहे,” असे ते पुढे म्हणाले.