जगातील सर्वात मोठा पेट्रोप्रकल्प कोकणात

By admin | Published: February 24, 2017 01:44 AM2017-02-24T01:44:03+5:302017-02-24T01:44:03+5:30

इंडियन आॅईल, भारत पेट्रोलियम आणि हिदुस्तान पेट्रोलियम या तीन सरकारी तेल कंपन्या मिळून उभारणार

The world's largest petro-project Konkan | जगातील सर्वात मोठा पेट्रोप्रकल्प कोकणात

जगातील सर्वात मोठा पेट्रोप्रकल्प कोकणात

Next

नवी दिल्ली : इंडियन आॅईल, भारत पेट्रोलियम आणि हिदुस्तान पेट्रोलियम या तीन सरकारी तेल कंपन्या मिळून उभारणार असलेल्या जगातील सर्वात मोठ्या तेल शुद्धीकरण व पेट्रोकेमिकल प्रकल्पासाठी रत्नागिरी जिल्ह्याच्या राजापूर तालुक्यातील बाभुळवाडी गावाची निवड निश्चित झाली आहे.
मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रिजचा जामनगर, गुजरात येथील ३३ लाख टन वार्षिक क्षमतेचा प्रकल्प जगातील सर्वात मोठा तेल शुद्धीकरण कारखाना म्हणून गणला जातो. बाभुळवाडी प्रकल्पाची क्षमता याहून सुमारे दुप्पट म्हणजे वार्षिक ६० लाख टन एवढी असेल. या प्रकल्पासाठी सुमारे १.५ लाख कोटी रुपये गुंतवणूक अपेक्षित असून त्यातून रोजगाराच्या हजारो संधी उपलब्ध होतील.
सर्व बाबींचा तौलनिक अभ्यास करून बाभुळवाडीची अंतिमत: निवड करण्यात आली. या कामासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून काम करणाऱ्या इंजिनीअर्स इंडिया लि.ने प्रकल्प उभारणीसाठी प्राथमिक अभ्यास व तयारी सुरू केली आहे.
बाभुळवाडी हे राजापूर तालुक्यातील समुद्र किनाऱ्यापासून सुमारे १५ किमी आत असलेले, अवघ्या ५६४ लोकवस्तीचे गाव आहे. (२५७ पुरुष व ३०७ महिला). यापैकी मुख्य तेल शुद्धीकरण कारखाना १४ हजार एकर जागेवर उभारला जाईल. अनुषंगिक साठवणूक टाक्यांचे आवार व बंदराशी निगडित सुविधा जवळच समुद्रकिनारी आणखी एक हजार एकर जागेवर उभारण्याची योजना आहे.
एकाहून अधिक सरकारी तेल कंपन्यांनी मिळून अशा प्रकारचा महाकाय प्रकल्प उभारण्याची कल्पना पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी डिसेंबर २०१५ मध्ये सर्वप्रथम मांडली. डिसेंबर २०१६ मध्ये इंडियन आॅईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या तीन कंपन्यांनी ‘पेट्रोटेक २०१६’च्या वेळी सामंजस्य करार केला. हा प्रकल्प ४० लाख टन व ४० लाख टन अशा २ टप्प्यांत उभारण्यात येईल. तिथे आखाती देशांतून कच्चे तेल समुद्रमार्गे आणले जाईल. भारताची विद्यमान तेल शुद्धीकरण क्षमता वर्षाला दोन कोटी ३० लाख टन एवढी आहे. त्यापैकी सरकारी कंपन्यांची क्षमता १.५० कोटी टन तर खासगी कंपन्यांची ८० लाख टन आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: The world's largest petro-project Konkan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.