सुरू झाला लसोत्सव...!; जगातील सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेचा पंतप्रधान मोदींच्या हस्ते प्रारंभ
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2021 12:27 AM2021-01-17T00:27:38+5:302021-01-17T00:57:18+5:30
भारतात बनविलेल्या लसींच्या साहाय्यानेच लसीकरण मोहीम राबविली जाणार असून आपण कोरोना साथीवर नक्कीच विजय मिळवू, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लसीकरणाचा शुभारंभ केल्यानंतर सांगितले.
नवी दिल्ली : कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम भारतामध्ये शनिवारपासून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते सुरू झाली. कोरोना साथीने देशात दहा महिन्यांत एक कोटीपेक्षा जास्त लोक बाधित झाले असून दीड लाखांहून अधिक लोकांचा बळी गेला आहे. त्यामुळे बहुप्रतिक्षित असलेली लसीकरण मोहीम सुरू झाल्याने भारतीयांना आता दिलासा मिळाला आहे. राज्यातही या मोहिमेचा प्रारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वांद्रे-कुर्ला संकुलातील कोविड लसीकरण केंद्रापासून केला.
भारतात बनविलेल्या लसींच्या साहाय्यानेच लसीकरण मोहीम राबविली जाणार असून आपण कोरोना साथीवर नक्कीच विजय मिळवू, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लसीकरणाचा शुभारंभ केल्यानंतर सांगितले. जगात ३ कोटी लोकसंख्या असलेले १०० पेक्षा जास्त देश आहेत. त्यांच्या तुलनेत भारत लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यातच प्राधान्याने डॉक्टर, आरोग्यसेवक, कोरोना योद्धे अशा तीन कोटी लोकांना लस देणार आहे. ५० वर्षे वयाच्या पुढील तसेच एकाहून अधिक व्याधींनी ग्रस्त असलेल्या ५० वर्षांखालील व्यक्ती यांसह २७ कोटी लोकांना कोरोना लस देण्यात येईल. येत्या ऑगस्ट महिन्यापर्यंत देशातील ३० कोटी लोकांना कोरोना लस देण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे.
अॅस्ट्राझेनेका व ऑक्सफर्ड विद्यापीठाने विकसित केलेली कोविशिल्ड लस तसेच भारत बायोटेक कंपनीने बनविलेल्या कोवॅक्सिन या लसींना आपत्कालीन वापरासाठी औषध महानियंत्रकांनी परवानगी दिली व त्यानंतर काही दिवसातच कोरोना लसीकरण मोहिमेला देशात सुरुवात झाली आहे. कोवॅक्सिन, कोविशिल्ड या लसी दोन डोसच्या आहेत. पहिल्या डोसनंतर २८ दिवसांनी दुसरा डोज देण्यात येणार आहे. लसीकरणासाठी देशातील प्रत्येक राज्य, केंद्रशासित प्रदेशात केंद्र उभारण्यात आली आहेत. या मोहिमेसाठी सुमारे ६ लाख लोकांना प्रशिक्षण देण्यात आले. कोरोना लस घेणे हे सक्तीचे नाही.
...तर भारत बायोटेक देणार नुकसानभरपाई
‘कोव्हॅक्सिन’ या लसीमुळे काही दुष्परिणाम झाल्यास नुकसान भरपाई करणार असल्याचे भारत बायोटेकने जाहीर केले. सौम्य किंवा गंभीर दुष्परिणाम आढळून आल्यास सरकारमान्य रुग्णालयांमध्ये उपचार करण्यात येतील.
कुणावरही दुष्परिणाम नाही -
लसीकरणाचा पहिल्या दिवसाअखेर कोणालाही दुष्परिणाम किंवा रुग्णालयात दाखल करण्याची घटना घडलेली नाही. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत १ लाख ९१हजार १८१णांना लस देण्यात आली आहे. देशभरात ३३५१ केंद्रांवर एकूण १६ हजार ७५५ कर्मचारी या मोहिमेत सहभागी झाल्याची माहिती सरकारने दिली आहे.
देशात स्वच्छता कर्मचाऱ्याला दिली पहिली लस -
देशात लसीकरण मोहिमेमध्ये पहिली लस दिल्लीच्या एम्स रुग्णालयातील मनीषकुमार या स्वच्छता कर्मचाऱ्याला देण्यात आली.
महाराष्ट्रात पहिल्याच दिवशी सुमारे -
१८,३३८ हून अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली. हे प्रमाण ६४ टक्के इतके आहे. तर राज्यात दिवसभरात मुंबईत सर्वाधिक १ हजार ९२६ व्यक्तींचे लसीकरण करण्यात आले.
दवाई भी, कडाई भी - नरेंद्र मोदी
लस घेतल्यानंतरही मास्क परिधान करणे व फिजिकल डिस्टन्सिंग या गोष्टींचे पालन नागरिकांनी सुरूच ठेवायचे आहे. ‘दवाई भी, कडाई भी’ (औषधही व नियमांचे पालनही) ही घोषणा नागरिकांनी कायम ध्यानात ठेवायची आहे.
संकट अद्याप संपलेले नाही - उद्धव ठाकरे
कोविडवरील लस येणार, लसीकरण सुरू हाेणार, अशी चर्चा अनेक दिवसांपासून होती. अखेर लसीकरणाचा दिवस शनिवारी उजाडला. मात्र, अद्याप कोरोनाचे संकट टळलेले नाही. सर्वांना लस मिळेपर्यंत काही दिवस, महिने लागणार आहेत. आपल्याला कोरोनाचा शेवट करायचा आहे. त्यासाठी सज्ज व्हा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे
स्मार्ट फोन नसलेल्यांची होणार पंचाईत -
लस घेऊ इच्छिणाऱ्याने को-विन अॅपवर स्वत:च्या नावाची नोंदणी करायची आहे. भारतातील अनेक नागरिकांकडे स्मार्ट फोन नाही. अशा नागरिकांने काय करावे, असा नवा प्रश्न उपस्थित झाला आहे.