Worlds Population: या मुलीच्या जन्मासह जगाची लोकसंख्या पोहोचली 800 कोटींवर; कोण आहे ही चिमुकली..?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2022 01:29 PM2022-11-15T13:29:45+5:302022-11-15T13:42:33+5:30
आज जगातील लोकसंख्येने 800 कोटींचा टप्पा ओलांडला असून, गेल्या 48 वर्षात यात दुपटीने वाढ झाली आहे.
नवी दिल्ली: आज जगाची एकूण लोकसंख्या आता 800 कोटींवर पोहोचली आहे. हा मानवाच्या इतिहास व विकासातील महत्त्वाचा टप्पा असल्याचे मत संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनिओ गुटेरेस यांनी म्हटले आहे. वाढती लोकसंख्या हे चिंतेचे कारण असले तरीदेखील लोकांमध्ये उत्सुकता आहे की, 800 कोटीवे मूल कोण आहे?
बाळाचा जन्म कुठे झाला?
जगातील 800 कोटीव्या मुलाचा जन्म कुठे झाला, याबाबात अनेकजण गूगलवर सर्च करत आहेत. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की, या मुलाचा जन्म सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या चीन किंवा भारतात झाला नाही. या चिमुकलीचा जन्म फिलीपिन्सची राजधानी मनिला इथे झाला आहे. आज सकाळी मनिलामध्ये एका मुलीचा जन्म झाला असून ती जगातील 800 कोटी नंबरची मुलगी असल्याचा दावा केला जात आहे.
LOOK: Meet baby girl Vinice Mabansag—isa sa sumisimbolo bilang ika-8 bilyong tao sa mundo. Ipinanganak siya sa Dr. Jose Fabella Memorial Hospital kaninang 1:29am. | @gmanewspic.twitter.com/RQE0NSZCjm
— Nico Waje (@nicowaje) November 14, 2022
बाळाचे पालक खूप आनंदी
नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत लोकसंख्या आठ अब्जांपर्यंत पोहोचेल, असा अंदाज संयुक्त राष्ट्रांनी यापूर्वीच व्यक्त केला होता. त्यांचा अंदाज अगदी खरा ठरला. या नवजात बालकाचे नाव विनिस मबनसाग ठेवण्यात आले आहे. तिची आई खूप आनंदित आहे. ती म्हणाली की, माझ्या मुलीला जगातील 8 अब्जवे मूल मानले जात असल्याचा आनंद आहे. कमिशन फॉर पॉप्युलेशन अँड डेव्हलपमेंट (POPCOM) चे मुख्य प्रशासकीय अधिकारी लिनथ थेरेसे मोन्साल्वे म्हणाले की, विनिस भविष्यात विकासाचे रोल मॉडेल बनेल अशी अपेक्षा करू.
48 वर्षात जगाची लोकसंख्या दुप्पट
जगाची लोकसंख्या आज 8 अब्ज झाली आहे, यामुळे भविष्यात अन्नधान्यासह इतर गरजांची कमतरता भासू शकते. पण, तज्ञांच्या मते या शतकात एक वेळ अशी येईल, जेव्हा लोकसंख्या वाढ स्थिर होईल आणि नंतर घट देखील दिसून येईल. मात्र गेल्या 48 वर्षांत झालेली लोकसंख्या धक्कादायक आहे. 1974 मध्ये जगाची लोकसंख्या फक्त 4 अब्ज होती, ती आता 8 अब्जच्या पुढे गेली आहे. 1950 मध्ये जगाची लोकसंख्या फक्त अडीच अब्ज होती. एवढेच नाही तर 2086 हे असे वर्ष असेल, जेव्हा या जगातील मानवांची लोकसंख्या 10.6 अब्जांच्या पुढे जाईल.