चिंताजनक! नक्षली हिंसाचारामुळे दहा वर्षांत देशाने गमावले 1150 जवान
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2019 02:05 PM2019-05-02T14:05:38+5:302019-05-02T14:06:07+5:30
गेल्या दहा वर्षांमध्ये राबवलेल्या नक्षलविरोधी अभियानादरम्यान सुरक्षा दलांचे सुमारे 1150 जवान शहीद झाले आहेत, तर 1300 हून अधिक जवान जखमी झाले आहेत.
गडचिरोली - बुधवारी गडचिरोलीमधील कुरखेडा येथून टाटा एस या मालवाहू वाहनाने जवानांचे पथक जात असताना नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या भूसुरुंग स्फोटामध्ये क्यूआरसीच्या 15 जवानांसह 16 जणांचा मृत्यू झाला होता. नक्षलवाद्यांनी आपल्या प्रभाव क्षेत्रात घडवून आणलेला हा काही पहिलाच हल्ला नाही. गेल्या दहा वर्षांमध्ये राबवलेल्या नक्षलविरोधी अभियानादरम्यान सुरक्षा दलांचे सुमारे 1150 जवान शहीद झाले आहेत, तर 1300 हून अधिक जवान जखमी झाले आहेत.
पश्चिम बंगालमधील नक्षलवाडी येथून सुरू झालेला नक्षलवाद आता देशातील 11 राज्यांमधील 90 जिल्ह्यांत फोफावला आहे. सरकार आणि सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांचा बीमोड करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मोहीम हातात घेतली असली तरी नक्षली हल्ल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्तहानी होत आहे. गेल्या सात वर्षांत केंद्र आणि राज्य सरकारांनी केलेल्या प्रयत्नांमुळे सुरक्षा दलांच्या होणाऱ्या जीवितहानीमध्ये घट झाली असती तरी छत्तीसगडमधील दंडेवाडा आणि गडचिरोलीमध्ये काही ठिकाणी नक्षलवाद्यांनी आपले प्रभावक्षेत्र कायम राखले आहे.
गडचिरोली येथे झालेल्या नक्षलवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही काळात देशात झालेल्या मोठ्या नक्षलवादी हल्ल्यांचा घेतलेला आढावा.
9 एप्रिल 2019 - दंतेवाडा येथे भाजपा आमदार भीमा मंडावी यांची भूसुरुंग स्फोट घडवून हत्या, मंडावी यांच्यासोबत चार जवानही शहीद, तर 4 एप्रिल रोजी बस्तर येथे बीएसएफच्या जार जवानांची हत्या
12 मार्च 2018 - छत्तीसगडमधील सुकमा येथे सीआरपीएफच्या 212 बटालियनच्या जवानांवर हल्ला, 9 जवान शहीद
मे 2018 - दंतेवाडा येथे छत्तीसगड आर्म फोर्सचे 7 जवान शहीद
जून 2018 - झारखंड जग्वार फोर्सचे सहा जवान शहीद
23 सप्टेंबर 2018 - विशाखापट्टणम येथे टीडीपी आमदार किदारी सर्वेश्वर राव आणि माजी आमदार सिवेरी यांची हत्या
30 ऑक्टोबर 2018 - छत्तीसगडमधील दंतेवाडा येथे दूरदर्शनचे कॅमेरामन आणि दोन पोलिसांची हत्या
23 मे 2013 - छत्तीसगडमधील सुकमा येथे काँग्रेसच्या परिवर्तन यात्रेवर हल्ला, विद्याचरण शुक्ल, महेंद्र कर्मा, नंदकुमार पटेल या दिग्गज नेत्यांसह 25 जणांचा मृत्यू
6 एप्रिल 2010 - छत्तीसगडमधील दंतेवाडा जिल्ह्यातील चिंतलनार जंगलात सीआरपीएफच्या 75 जवानांसह 76 जणांची हत्या
10 एप्रिल 2010 - ओदिशामधील कोरापूट जिल्ह्यात पोलिसांच्या बसवर हल्ला, 10 जवान शहीद, 16 जखमी
23 मार्च 2010 - बिहारच्या गया जिल्ह्यात स्फोट घडवून रेल्वे मार्ग उडवला, त्याच दिवशी हावडा मुंबई रेल्वे मार्गावरही स्फोट घडवला
15 मार्च 2010 - पश्चिम बंगालमधील सिल्दा येथे पोलीस तळावर हल्ला 24 जवान शहीद
8 ऑक्टोबर 2009 - गडचिरोली येथील लाहिडी पोलीस ठाण्यावर हल्ला, 17 पोलीस शहीद
गडचिरोली जिल्ह्यात नक्षली कारवायांमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा
2010 - 43
2011 -65
2012 - 36
2013 - 43
2014 - 30
2015 - 16
2016 -22
2017 -24
2018 - 58
2019 - 20 (आतापर्यंत)