चिंताजनक! माध्यमस्वातंत्र्याच्या क्रमवारीत भारताची घसरण, 180 देशांमध्ये मिळाले 140 वे स्थान
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2019 09:52 PM2019-04-18T21:52:12+5:302019-04-18T21:52:54+5:30
भारतात प्रसारमाध्यमांची गळचेपी होत असल्याचा आरोप सातत्याने होत असतो. याबाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.
नवी दिल्ली - भारतात प्रसारमाध्यमांची गळचेपी होत असल्याचा आरोप सातत्याने होत असतो. याबाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. माध्यमस्वातंत्र्य असलेल्या देशांच्या क्रमवारीत भारताची दोन क्रमांकांनी घसरण झाली असून, 180 देशांमध्ये भारताला 140 वे स्थान मिळाले आहे. तसेच निवडणूक प्रचारासा काळ हा भारतातील पत्रकारांसाठी सर्वाधिक धोकादायक असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स 2019 म्हणजेच जागतिक माध्यमस्वातंत्र क्रमवारी 2019 मध्ये नॉर्वेने अव्वलस्थान पटकावले आहे. जगभरात पत्रकारांबाबत द्वेशाची भावना वाढत चालली आहे, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे गेल्यावर्षी किमान सहा पत्रकारांची हत्या केली गेली. भारतात पत्रकारांसोबत होणाऱ्या हिंसेमध्ये पोलिसांकडून होणारी हिंसा, नक्षलवाद्यांकडून होणारी हिंसा, गुन्हेगारी समूह आणि राजकारण्यांकडून घेण्यात येणाऱ्या बदल्याचा समावेश आहे.
रिपोर्टर्स विदआउट बॉर्डर्स ना नफा ना तोटा तत्त्वावर चालणारी संघटना आहे. या संस्थेकडून जगभरात पत्रकारांवर होणाऱ्या हल्यांच्या घटनांचे एकत्रिकरण करण्याचे काम केले जाते. पत्रकारांबाबत असलेल्या द्वेषाचे हिंसेत रूपांतर होत आहे. त्यामुळे जगभरात भीतीचे वातावरण वाढले आहे, असे 2019 ची क्रमवारी तयार करताना रिपोर्टर्स विदआउट बॉर्डर्सच्या निदर्शनास आले आहे.
भारतात हिंदुत्वाविरोधात लिहिणाऱ्या पत्रकारांविरोधात सोशल मीडियावर चालवण्यात येणाऱ्या द्वेषकारक अभियानांबाबत या अहवालांमध्ये चिंता व्यक्त केली आहे. तसेच मी टू अभियानामधून महिला वार्ताहरांच्या लैंगिक शोषणाबाबत समोर आलेल्या घटनांचाही यात उल्लेख आहे. दक्षिण आशियाचा विचार केल्यास माध्यम स्वातंत्र्याच्या क्रमवारीत स्थान मिळालेल्या 180 देशांच्या यादीत भारत 140 व्या, पाकिस्तान 142 व्या, बांगलादेश 150 व्या क्रमांकावर आहे. या क्रमवारीत नॉर्वे प्रथम तर फिनलँड दुसऱ्या स्थानी आहे.