चिंताजनक! हवा प्रदूषणामुळे भारतात होतोय दर आठमधील एक मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2018 11:34 AM2018-12-07T11:34:43+5:302018-12-07T11:48:37+5:30
भारतात होणाऱ्या दर आठ मृत्यूंपैकी एक मृत्यू हा हवा प्रदूषणामुळे होत असल्याचा धक्कादायक निष्कर्ष एका अहवालामधून समोर आला आहे.
नवी दिल्ली - प्रचंड वृक्षतोड, औद्योगिकीकरण आणि वाहनांची मोठ्या प्रमाणात वाढलेली संख्या यामुळे गेल्या काही वर्षांत भारतातील वायू प्रदूषण वाढले आहे. त्यामुळे भारतात होणाऱ्या दर आठ मृत्यूंपैकी एक मृत्यू हा हवा प्रदूषणामुळे होत असल्याचा धक्कादायक निष्कर्ष एका अहवालामधून समोर आला आहे.
इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमएमआर) ने प्रसिद्ध केलेल्या अहवालामध्ये हा दावा करण्यात आला आहे. अशा प्रकारचा संशोधन होण्याची होण्याची भारतातील ही पहिलीच वेळ असून, यामध्ये प्रदूषित हवेमुळे होणारे मृत्यू आणि प्रदूषणाचा आजार आणि आयुर्मानावर होणारा परिणाम यांचा अभ्यास करण्यात आला आहे. प्रदूषणामुळे भारतातील लोकांचे सरासरी आयुर्मान घटत असून, शुद्ध हवा मिळाली असती तर यापैकी अनेकांचे आयुर्मान हे एक वर्ष सात महिन्यांनी वाढले असते, असा निष्कर्ष या अहवालातून काढण्यात आला आहे. भारतातील 77 टक्के लोकसंख्या वायू प्रदूषणाच्या विळख्यात असून, हे प्रदूषण तंबाखूपासून असलेल्या धोक्यापेक्षा अधिक धोकादायक ठरत असल्याचे या अहवालात म्हटले आहे.
तंबाखूचे कोणत्याही स्वरूपातील सेवन हे आरोग्यासाठी हानीकारक असते. त्यामुळे कॅन्सरसारख्या गंभीर आजारांचा धोका उदभवतो. मात्र नव्या अभ्यासानुसार तंबाखूमुळे असलेल्या आजारांच्या धोक्यापेक्षा प्रदूषणामुळे निर्माण होणारा आजारपणांचा धोका अधिक आहे. तसेच गतवर्षी 2017 मध्ये भारतात 17.4 लाख लोकांच्या मृत्यूसाठी कुठल्या ना कुठल्या स्वरूपात वायू प्रदूषण जबाबदार असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
या अभ्यासानुसार, लोअर रेस्पिरेटरी इन्फ्लेक्शनची तुलना केल्यास ही तंबाखूपेक्षा वायू प्रदूषणामुळे होत आहे. केवळ फुफ्फुसाचा कर्करोग हा तंबाखूमुळे अधिक होत आहे. प्रति एक लाख व्यक्तींमागे 49 जणांना वायू प्रदूषणामुळे फुफ्फुसाचा कर्करोग होत आहे. तर तंबाखूमुळे 62 जणांना फुफ्फुसाचा कर्करोग होत आहे. तसेच वायूप्रदूषणामुळे गर्भतापाचा धोकाही वाढला असल्याचे अमेरिकेतील यूटा विद्यापीठाच्या संशोधनातून समोर आले आहे.