विजयापेक्षा देशाची चिंता जास्त

By admin | Published: February 8, 2017 05:42 AM2017-02-08T05:42:00+5:302017-02-08T05:42:00+5:30

देशाची अर्थव्यवस्था तंदुरुस्त करण्यासाठी आणि गरिबांना त्यांचे हक्क परत मिळवून देण्यासाठी आमच्या सरकारने नोटाबंदीचा निर्णय घेतला

The worry of the country is more than victory | विजयापेक्षा देशाची चिंता जास्त

विजयापेक्षा देशाची चिंता जास्त

Next

सुरेश भटेवरा, नवी दिल्ली
देशाची अर्थव्यवस्था तंदुरुस्त करण्यासाठी आणि गरिबांना त्यांचे हक्क परत मिळवून देण्यासाठी आमच्या सरकारने नोटाबंदीचा निर्णय घेतला. पूर्वीचे सत्तेवर असताना, सरकारी तिजोरीतून किती पैसे भ्रष्टाचार आणि घोटाळ्यात गेले, याची चर्चा असायची. नोटाबंदीनंतर मात्र सरकारच्या तिजोरीत किती पैसे आले, याची चर्चा आहे. यापेक्षा समाधानाची बाब दुसरी काय असू शकते, असे प्रतिपादन करतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी काँग्रेस व गांधी घराण्याची खिल्ली उडवली आणि इतर विरोधकांनाही चिमटे काढले.
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावाच्या चर्चेचा समारोप करताना पंतप्रधानांनी १0५ मिनिटे केलेले भाषण प्रचार सभेप्रमाणेच होते. एकदा सन्माननीय सदस्य म्हणण्याऐवजी चक्क भाईयों और बहनों संबोधित पुढला मुद्दा बोलायला मोदींनी सुरुवात केली, तेव्हा विरोधकांनी त्यांना हे सभागृह आहे, प्रचारसभा नाही, याची जाणीव करून दिली.

सरकारच्या कारकीर्दीचा आढावा घेताना पंतप्रधान म्हणाले : गेल्या ३ वर्षांत ११00 हून अधिक कालबाह्य कायदे आम्ही रद्द केले. गरीबांच्या हक्काचे ५0 हजार कोटी दरवर्षी दलाल खात होते. ते बंद झाले असून ही रक्कम आम्ही वाचवली आहे. वीज तुटवड्याचे संकट बऱ्यापैकी संपले आहे. परिवहन व्यवस्थेचे एकत्रित धोरण ठरवावे व त्याचा वेगाने विकास याचा सरकारने पुरस्कार केला आहे. आॅप्टिकल फायबर नेटवर्क ७६ हजार गावांपर्यंत पोहोचले. शक्य आहे अशा ४0 टक्के लोकांनी कॅशलेस व्यवस्थेचा स्वीकार केला पाहिजे, असा सरकारचा आग्रह आहे. अर्थसंकल्पात सरकारने अनुसूचित जाती जमातींसाठी अधिक तरतूद केली. युरिया मागणीचे संकट संपवले. लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकाचवेळी झाल्या तर खर्चाचा मोठा अपव्यय वाचवला जाऊ शकतो, याचाही पुनरूच्चार पंतप्रधानांनी केला.


मनरेगा आणि नोटाबंदी
अंतरपट मे खोजिए छिपा हुवा है खोट मिल जायेगी आपको बिलकुल सत्य रिपोर्ट या हास्यकवी काका हाथरसींच्या काव्यपंक्ती उधृत करीत नोटाबंदीच्या निर्णयानंतर १५0 वेळा नियम का बदलले याचे उत्तर देतांना, मोदींनी काँग्रेसला अतिप्रिय असलेल्या मनरेगाचे नियम १0३५ वेळा का बदलले गेले, असा प्रतिप्रश्नही केला.

नोटाबंदी म्हणजे, ‘स्वच्छ भारत’!
नोटाबंदीच्या निर्णयाचा उल्लेख त्यांनी स्वच्छ भारत अभियानाशी केला. ही मोहीम यापुढेही मी चालूच ठेवणार आहे, अशी गर्जना करीत मोदी म्हणाले, नोटाबंदीबाबत मंत्रिमंडळालाही मी विश्वासात घेतले नाही, अशी टीका विरोधक करतात. मात्र हाच प्रश्न सर्जिकल स्ट्राइकच्या बाबतीत ते विचारीत नाहीत, कारण त्यांना त्याची भीती वाटते. त्यांच्या या विधानातून नोटाबंदीचा निर्णय मंत्रिमंडळाला अंधारात ठेवूनच घेतला गेल्याचे अधोरेखित झाले.

निवडणुकीची आम्हाला चिंता नाही
भ्रष्टाचाराचा उगम रोख रकमेतूनच होतो. नोटाबंदीनंतर देशातल्या रोख रकमेचा सारा खातेउतारा रेकॉर्डवर आला आहे. आता मनमानी पद्धतीने प्राप्तिकर अधिकारी तुमच्या घरीदारी फिरकणार नाहीत. फक्त नोटीस पाठवून विचारले जाईल. बेनामी संपत्तीचा कायदा आम्ही किती कठोर बनवला आहे, ते एकदा जरूर समजावून घ्या. अशा निर्णयांसाठी कमालीचे धाडस लागते. ते आम्ही दाखवले कारण निवडणुकीत काय होईल याची चिंता आम्हाला नाही. आम्हाला अधिक चिंता देशाची आहे. दोन सरकारांच्या कार्यसंस्कृतीतला हाच मुख्य फरक आहे.

सावरकरांचे स्मरणही करावेसे वाटले नाही?
काँग्रेसला वाटते की देशाला स्वातंत्र्य केवळ एका परिवारामुळेच मिळाले आहे, चाफेकर बंधू, भगतसिंग, चंद्रशेखर आझाद यांना काँग्रेसने कधीच सन्मान दिला नाही. १८५७चा स्वातंत्र्यलढा जेव्हा लढला गेला, तेव्हा काँग्रेसचा जन्मही झाला नव्हता. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे स्मरणही काँग्रेसला कधी करावेसे वाटले नाही, अशा शब्दांत मोदी यांनी मल्लिकार्जुन खरगे यांच्या टीकेचा समाचार घेतला.

काँग्रेसचेही जळजळीत उत्तर
शीलेश शर्मा , नवी दिल्ली
‘शेवटी भूकंप झालाच’ या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उद््गाराने काँग्रेसचा संताप झाला. काँग्रेसनेही जळजळीत उत्तर दिले असून, मोदींनी उत्तराखंड आणि स्वातंत्र्यलढ्याचा अपमान केला असल्याचे राहुल गांधी यांनी टिष्ट्वटरवर म्हटले आहे.
राहुल गांधी यांचे प्रश्न 1 आठ नोव्हेंबरनंतर किती काळा पैसा बाहेर आला? देशाचे किती आर्थिक नुकसान झाले? किती लोक बेरोजगार झाले? नोटाबंदीमुळे किती लोकांचा मृत्यू झाला? त्यांना नुकसानभरपाई दिली का?
2मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय घेताना किती लोकांशी चर्चा केली होती? तज्ज्ञांशी त्यांनी चर्चा का केली नाही? सहा महिन्यांत कोणी-कोणी २५ लाख व त्यापेक्षा जास्त रक्कम जमा केली?

लोकांना भाषण नको तर काम हवे आहे. चांगले भाषण केले म्हणजे चांगले दिवस येतात, असे नाही. लोकांना काम हवे आहे, भाषणाचा लॉलिपॉप नकोय. - शशी थरूर, काँग्रेस

Web Title: The worry of the country is more than victory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.