चिंताजनक!युद्धाशिवायच भारतीय लष्कराला दरवर्षी गमावावे लागताहेत 1600 जवान
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2017 08:02 AM2017-12-03T08:02:10+5:302017-12-03T08:28:15+5:30
पाकिस्तानकडून सीमेवर सातत्याने सुरू असणारी आगळीक, काश्मीरसारख्या अशांत प्रदेशातील दहशतवादी कारवाया यामुळे भारतीय लष्करातील जवानांना नेहम प्राण तळहातावर ठेवून कर्तव्य बजावावे लागते. दरम्यान, भारतीय लष्कराला दरवर्षी युद्धाशिवायच सुमारे 1600 जवानांना गमवावे लागत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
नवी दिल्ली - पाकिस्तानकडून सीमेवर सातत्याने सुरू असणारी आगळीक, काश्मीरसारख्या अशांत प्रदेशातील दहशतवादी कारवाया यामुळे भारतीय लष्करातील जवानांना नेहम प्राण तळहातावर ठेवून कर्तव्य बजावावे लागते. दरम्यान, भारतीय लष्कराला दरवर्षी युद्धाशिवायच सुमारे 1600 जवानांना गमवावे लागत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. यापैकी सर्वाधिक जवानांचा मृत्यू हा रस्ते अपघात आणि आत्महत्यांमुळे होत आहे. हा आकडा काश्मीरमधील दहशतवादी कारवायांमध्ये गमवाव्या लागणाऱ्या जवानांच्या संख्येपेक्षा अधिक आहे.
जवानांच्या अशा पद्धतीने होणाऱ्या मृत्युमुळे लष्करासमोरील चिंता वाढली आहे. टाइम्स ऑफ इंडियाने यासंदर्भातील वृत्त प्रकाशित केले असून, या वृत्तामधील आकडेवारीमधूम हे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. या आकडेवारीनुसार दरवर्षी 350 जवान, नौसैनिक आणि हवाई दलाचे जवान रस्ते अपघातांमध्ये आपला जीव गमावतात. तर दरवर्षी सुमारे 120 जवान आत्महत्या करत आहेत. भारतात रस्ते अपघात आणि आत्महत्येमुळे मृत्यू होणाऱ्या लोकांची संख्या अधिक आहे. मात्र कठोर प्रशिक्षण आणि शिस्तीसाठी प्रसिद्ध असलेल्या भारतीय लष्कराच्या जवानांचे अशाप्रकारे होत असलेले मृत्यू चिंताजनक आहेत.
2014 पासून लष्कर, नौदल आणि हवाई दलाने आपले सुमारे 6 हजार 500 जवान गमावले आहेत. सुमारे 11 लाख 73 हजार एवढी सैनिक संख्या असलेल्या भारतीय सैन्य दलांसाठी हा एक मोठा आकडा आहे. जवानांच्या अशाप्रकारे होणाऱ्या मृत्युंमुळे हवाई दल आणि नौदलाच्या मनुष्यबळामध्ये मोठी घट होत आहे. लष्करामध्ये युद्धात वीरमरण येणाऱ्या जवानांपेक्षा 12 पट अधिक जवान हे शारीरिक दुखापतींचे बळी ठरत आहेत. आकडेवारीनुसार 2016 मध्ये सीमारेषेवर होणारा गोळीबार आणि दहशतवादी कारवायांमध्ये 112 जवानांना वीरमरण आले होते. मात्र याच काळात सुमारे 1 हजार 480 जवान अपघात, आत्महत्या आणि इतर कारणांमुळे मृत्युमुखी पडले. यावर्षीसुद्धा सुमारे 80 जवानांना वीरमरण आले आहे. तर एक हजार 60 जवानांना अपघात, आत्महत्या आणि इतर कारणांमुळे जीव गमवावा लागला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी याबाबत गेल्या महिन्यात चिंता व्यक्त केली होती. कारण अपघात, आत्महत्या आणि इतर कारणांमुळे लष्कराला दरवर्षी सुमारे दोन बटालियन गमवाव्या लागत आहेत. एका अधिकाऱ्याने सांगितले की, लष्करप्रमुखांनी याविषयी वेळीच लक्ष देण्यास सांगितले आहे.
नोकरीच्या दबावामुळे होणारे मृत्यू जसे की आत्महत्या किंवा सहकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची होणारी हत्या अशा कारणांमुळे होणाऱ्या मृत्यूंचा आकडाही मोठा आहे.
जम्मू-काश्मीर आणि पूर्वोत्तर राज्यात चालवण्यात येत असलेल्या दहशतवाद विरोधी मोहिमांमधील दीर्घकाळ सहभागामुळे जवानांवर दबाव असतो. त्याशिवाय जवानांना मिळणारे कमी वेतन, सुट्ट्या, इतर सुविधांची कमतरता यामुळेही जवान तणावाखाली असतात. या समस्या सोडवण्यासाठी जवानांचे समुपदेशन, कुटुंबासोबत राहण्याची परवानगी, सुट्ट्या मिळण्याची सुविधा आणि तक्रारींचे त्वरित निवारण्याची सुविधा देऊन जवानांच्या स्थितीत सुधारणा करता येईल.